भाषण :- 13.02.2024: राज्यपालांच्या हस्ते ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उदघाटन
13.02.2024: महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे (कलाकार विभाग) उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज जहांगीर कलादालन येथे पार पडले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते जाहिरात व डिझाईन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार अरुण पद्मनाभ काळे यांना ‘कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धातुकला क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार विवेकानंद दास यांना ६३ वा महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन कलाकार विभागातील ज्येष्ठ कलाकार पुरस्कार देण्यात आला. यावेळी दृश्य कला क्षेत्रातील १५ युवा कलाकारांना देखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कला संचालक राजीव मिश्रा व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात राज्यातील अनेक कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या असून प्रदर्शन दिनांक १९ फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार आहे.