बंद

    राज भवन, महाबळेश्वर

    राज भवन, महाबळेश्वर

    महाबळेश्वर आणि पुणे जवळजवळ एकाच वेळी ब्रिटीश राजवटीत मुंबईच्या गव्हर्नरची उन्हाळी निवासस्थाने राहिली आहेत. गव्हर्नरचे महाबळेश्वर येथील निवासस्थान पूर्वी ‘टेरेसेस’ या नावाने ओळखले जायचे. कालांतराने त्याचे नाव ‘गिरी दर्शन’ असे झाले. हे निवासस्थान लहान असले तरी टुमदार होते व सह्याद्रीचे पर्वतरांगांचे सौंदर्य पाहण्यासाठी आदर्श ठिकाण होते. पूर्वी गव्हर्नर आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यपाल या ठिकाणी उन्हाळ्यातील काही आठवडे राहतात व तेथूनच शेजारच्या जिल्ह्यांना भेट देऊन विकासकामांची पाहणी करतात तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतात.

    ‘टेरेसेस’ हा बंगला सन १८८४ साली खरेदी केला होता. त्यानंतर सन १८८६ साली त्याचा गव्हर्मेंट हाउस मालमत्तेमध्ये समावेश करण्यात आला. सन १९३२ साली गव्हर्नर यांचे पूर्वीचे निवासस्थान असलेला ‘बेला व्हिस्टा’चा बंगल्याचा वापर बंद करून त्या ऐवजी ‘टेरेसेस’ हा बंगला अधिकृत निवासासाठी वापरण्यात येऊ लागला.

    परंतु, काही काळ दोन्ही बंगल्यांचा त्या त्या वेळच्या गव्हर्नरच्या पसंतीनुसार वापर होत असावा असे समजण्यास वाव आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल महाबळेश्वर यांचे जाण्याचे ठरले असताना टेरेसेस बंगल्याच्या दुरुस्ती व रखरखावाचे काम हाती घेण्यात आले होते.

    मुंबईची खारी हवा आणि दमट हवामान यातून सुटका होण्याकरिता तसेच शहरापासून दूरवर निसर्गरम्य वातावरणात प्राकृतिक सौदंर्याचा आनंद घेण्याची आंतरिक आवड यामुळे गव्हर्नर एल्फिनस्टन ‘महाबलिसर’ (महाबळेश्वर) येथे जात असत .

    सवाई माधवराव पेशवे यांच्या दरबारातील इंग्रज ‘रेसिडंट’ चार्ल्स म्यालेट हे महाबळेश्वर टेकडीवर पाउल ठेवणारे कदाचित पहिले युरोपिअन असतील, परंतु दिनांक १ मे १८२४ च्या बॉम्बे कुरिअरमध्ये मेजर लॉडविक यांनी महाबळेश्वरचा एक आरोग्यदायी ठिकाण म्हणून उल्लेख केला.

    महाबळेश्वर सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसले असून याचाच उल्लेख पश्चिम घात असाही केला जातो. समुद्र सपाटीपासून हे ठिकाण ४७१८ फुट उंच आहे. जुन्या महाबळेश्वर येथील भगवान शंकराचे मंदीरावरून महाबळेश्वर हे नाव पडले आहे असे दिसते.

    महाबळेश्वरच्या जवळ मराठ्यांच्या इतिहासातील महत्वपूर्ण ठिकाण असलेला प्रतापगडचा किल्ला आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि बिजापूर दरबारातील सरदार अफझलखानाशी भेट झाली होती.