बंद

    23.02.2024: विकसित भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वपूर्ण – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: February 23, 2024

    आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न
    विकसित भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वपूर्ण
    – मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांचे प्रतिपादन

    नाशिक: (दि.23) – विकसित भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा तेविसावा दीक्षांत समांरभात विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस अध्यक्षस्थानी ऑनलाईन उपस्थित होते. या समारंभास व्यासपीठावर विद्यापीठाचे मा. प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.नामदार श्री. हसन मुश्रीफ प्रमुख अतिथी म्हणून व सन्माननीय अतिथी म्हणून बेळगांवचे के.एल.ई. अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे मा. कुलगुरु डॉ. नितीन गंगने, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे, मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., डॉ. ख्रिस्तोफर डिसूजा, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परिक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विठ्ठल धडके, डॉ. विभा हेगडे, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. वाय. प्रविणकुमार, डॉ. मनिष इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
    दीक्षांत समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठाचे कार्य महत्वपूर्ण आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्वांनी कोविडच्या काळात उल्लेखनीय काम केले आहे. पदवी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्रात सामाजिक भान जागृत ठेऊन मनोभावे रुग्णसेवा करावी. विकसित व आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीत आपली सर्वांचे कार्य महत्वपूर्ण आहे.
    ते पुढे म्हणाले की, देशाची प्रगतीचा स्तर हा पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित असतो. शैक्षणिक बाबीचा महत्वपूर्ण स्तंभाचा आपण भाग असून प्रत्येकाची भूमिका महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान संपादन करुन जागतिक स्तरावर होणारे संशोधनात नावलौकिक मिळवावा. संशोधनाला चालना मिळावी या हेतूने आरोग्य विद्यापीठाने विविध उपक्रम सुरु केले आहेत. त्याचा सकारात्मक उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाबरोबर नवीन क्रांती घडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. नवीन विचार आणि विज्ञानाची साथ असल्यास अत्यंत कमी कालावधीत यशस्वी होऊ अशी आशा बाळगतो असे त्यांनी सांगितले.
    विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार श्री. हसन मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, विद्यापीठामार्फत संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण यांवर मोठया प्रमाणात करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी व शिक्षकांकरीता कौशल्य आधारित नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जागतिक स्पर्धेत अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांचे संगोपन यात क्रांती होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेत आणि रुग्णसेवेमध्ये व्यग्र रहावे आणि काळानुरफप आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.
    ते पुढे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक जिल्हयात एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, नर्सिंग व आयुष अंतर्गत सर्वच विद्याशाखांचे महाविद्यालयांना मान्यता व त्याकरीता आवश्यक मनुष्यबळ यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाला मान्यता मिळेल असे गुणवत्तापूर्ण संशोधन प्रकल्पांना चालना देणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रातील सर्व पदवीधारकांनी रोगनिवारणाबरोबर रोगप्रतिबंधासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले
    विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी प्रास्ताविकात सांगितले की, तंत्रज्ञानाचा वापर विद्यापीठात मोठया प्रमाणात वाढला असून नॅशनल अकादमी डिपॉझिटरी अंतर्गत डिजिलॉकरवर विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सी.बी.एम.ई. एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या ब्लू प्रिंटचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच दंत अभ्यासक्रमाची ब्लू प्रिंट तयार केली असून फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची ब्लू प्रिंट अंतिम प्रक्रियेत आहे.
    ऽ इनोव्हेशन आणि आयडिया इनक्युबेशन उपक्रम नजीकच्या भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या मदतीने आणि सहकार्याने बळकट केले जाणार आहेत. ज्ञान आणि कौशल्ये जाणून विद्यार्थी-केंद्रित धोरणे आणि गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी, उच्च दर्जाचे आरोग्य व्यावसायिक तयार करण्यासाठी संशोधन आणि शिक्षणात उत्कृष्टता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सागितले.
    के.एल.ई. अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे मा. कुलगुरु डॉ. नितीन गंगने यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आरोग्य शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजातील लोकांची आरोग्य सेवा करण्यात द्यावा. शिक्षण आणि आरोग्य विकासातील महत्वपूर्ण बाबी आहेत. शिक्षणाबरोबर संशोधनाची जोड असणे गरजेचे आहे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. शिक्षण ही निरंतर घडणारी गोष्ट आहे त्यासाठी शिस्त व परिश्रम महत्वाचे आहेत. आरोग्य क्षेत्रात संशोधनासाठी मोठया प्रमाणात संधी उपलब्ध आहेत यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन नवनवीन कल्पनांना मूर्त रुप देऊ शकता असे त्यांनी सांगितले.
    डॉ. ख्रिस्तोफर डिसूजा यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, विद्यापीठाने केलेला सन्मान माझ्यासाठी उल्लेखनीय आहे. आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाचा विद्यापीठाकडून झालेला सन्मानाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आजवरच्या वाटचालीत मला कुटुंब, मित्र आणि विद्यापीठाकडून मिळालेले सहकार्यामुळे हा सन्मान शक्य झाला आहे. आरोग्य व रुग्ण सेवेच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा आदर्श घ्यावा असे काम सर्वांनी करावे असे त्यांनी सांगितले.
    या दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12486 स्नतकांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्णपदक, एक विद्यार्थ्यास रोखरक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
    विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 551, दंत विद्याशाखा पदवीचे 2195, आयुर्वेद विद्याशाखेचे 871, युनानी विद्याशाखेचे 99, होमिओपॅथी विद्याशाखेचे 1217, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 2464, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 366, बी.पी.टी.एच.विद्याशाखेचे 254,, पॅरामेडिकल विद्याशाखेचे 637, पदवी ऑप्टोमेट्री 52, ऑक्युपेशनल थेरपी पदवी अभ्यासक्रमाचे 17, बी.पी.ओ.विद्याशाखेचे 04 तसेच पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये पी.जी. मेडिकल 2864, पी. जी. दंत 497, पी.जी. आयुर्वेद 63, पी.जी. होमिओपॅथी 18, पी.जी. एम.ए.एस.एल.पी. 02, डिप्लोमा मेडिकल विद्याशाखेचे 02 , पी.जी. एम.पी.ओ. 02, पी.जी नर्सिंग 92, पी.जी. ऑक्युपेशनल थेरपीचे 29, पी.जी. फिजिओथेरपी 15, पी.जी. डि.एम.एल.टी. 87, डिप्लोमा पॅरामेडिकल विद्याशाखेचे 88 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे.
    आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. ख्रिस्टोफर डिसूजा यांना डी.लिट् ही विद्यापीठाची विशेष संमान्य पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे ’ई-प्रबोधिनी’ व बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेची ब्ल्यु प्रिंट यांचे प्रकाशन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी विव्दजन मिरवणूकीने समारंभास्थळी आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. परीक्षा नियंत्रक डॉ. यांनी मान्यवरांचे आभार मानले. मा. राज्यपालांना कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी पदवी प्रदानाबद्दल विनंती केली.या दीक्षांत समारंभाचे यु-टयुब चॅनेवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य, संलग्नित महाविद्यालाचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.