बंद

  19.07.2021: राज्यपालांच्या हस्ते ‘मुंबई रत्न’ पुरस्कार प्रदान

  प्रकाशित तारीख: July 19, 2021

  राज्यपालांच्या हस्ते ‘मुंबई रत्न’ पुरस्कार प्रदान
  प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिल्यास देश आत्मनिर्भर होईल: राज्यपाल

  रतन टाटा, आदी गोदरेज, आयुक्त इक्बाल सिंह चहल, निरंजन हिरानंदानी, उज्वल निकम, उदित नारायण, मंजू लोढा सन्मानित

  उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३१ निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘मुंबई रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. फिल्म्स टुडे, नाना नानी फाउंडेशन व एनार समूहातर्फे सदर पुरस्कार देण्यात आले.

  राज्यपालांच्या हस्ते गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अनंत गोयनका, वैद्यकीय तज्ञ डॉ गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायण, भजन सम्राट अनुप जलोटा, युनियन बँकेचे अध्यक्ष राजकिरण राय, डॉ शोमा घोष, आशिष चौहान आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा व वेदांत समूहाचे अनिल अगरवाल कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.

  कार्यक्रमाला फिल्म्स टुडेचे अध्यक्ष श्याम सिंघानिया व राजेश श्रीवास्तव उपस्थित होते.