बंद

    07.02.2024: मुंबई विद्यापीठाने देशातील 10 सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळवावे : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: February 7, 2024

    मुंबई विद्यापीठाने देशातील 10 सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळवावे : राज्यपाल

    मुंबई विद्यापीठाला अतिशय समृद्ध शैक्षणिक वारसा लाभला आहे. महात्मा गांधी, न्या महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, डॉ होमी भाभा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारखे महान लोक विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. उत्कृष्टतेची परंपरा राखत, आगामी काळात विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन इतर विद्यापीठांसमोर परिपाठ निर्माण करावा. पुढील दहा वर्षात मुंबई विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम दहा विद्यापीठांमध्ये स्थान मिळवावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केले.

    आपल्या स्थापनेच्या १६७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ बुधवारी (दि. ७ फेब्रु) राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    दीक्षान्त समारंभाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार, कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

    विद्यापीठाने प्रशासनात आमूलाग्र बदल करुन विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी एक उत्तम व्यवस्था निर्माण करावी, असे सांगताना विद्यापीठाने गावांना दत्तक घेऊन विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करावे अशी सूचना राज्यपालांनी केली. युवकांना कौशल्य शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने राज्य कौशल्य विद्यापीठासोबत काम करावे व उद्योगशीलता व नावीन्यतेला प्रोत्साहन द्यावे असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठाने माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठ विकास व विस्तार कार्याशी जोडावे अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    आपण सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण घेतले असून मुंबई विद्यापीठाचे स्नातक असल्याचे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त होईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळाले पाहिजे असे सांगताना जर्मनीत उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना जर्मनी भाषेचे शिक्षण दिले जाईल असे त्यांनी सांगितले. पूर्वप्राथमिक ते पदव्युत्तर अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे असे सांगून शैक्षणिक धोरण राबवताना सर्व विद्यापीठांनी परस्परांना सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले. पुढील काही वर्षात राज्यातील विद्यापीठांमधील पट नोंदणी ५० लाख इतकी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाने जगातील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये येण्याचा प्रयत्न करावा असेही आवाहन त्यांनी केले.

    महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नमूद करून राज्यातील विद्यापीठे लहान आकाराची ‘समूह विद्यापिठे’ तयार करण्यात देखील आघाडीवर आहेत असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी सांगितले. नव्या पिढीने एआय म्हणजे साहस व नावीन्यतेचा ध्यास घेतला पाहिजे असे जगदीश कुमार यांनी सांगितले. वैज्ञानिक जे सी बोस यांनी साहस व नावीन्यतेचा अंगीकार करत वनस्पती शरीरविज्ञान विषयात आमूलाग्र संशोधन केले असे सांगून विद्यार्थ्यांनी बोस यांचा आदर्श पुढे ठेवावा, असे त्यांनी सांगितले. विकसित भारत घडविण्यासाठी युवक, महिला, शेतकरी व गरीब अश्या सर्वच समाजघटकांचा सहभाग महत्वाचा आहे असे त्यांनी सांगितले.

    विद्यार्थ्यांनी प्रभू रामाप्रमाणे स्वतःमध्ये स्वत्वाचा शोध घेतला पाहिजे, भगीरथाप्रमाणे अथक परिश्रम केले पाहिजे तसेच श्रवण, मनन, चिंतन व ध्यास घेणारे आजन्म विद्यार्थी बनले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

    दीक्षान्त समारंभामध्ये १ लाख ५१ हजार ६४८ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. विविध विद्याशाखेतील ४२८ स्नातकांना विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी प्रदान करण्यात आली. विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या २१ विद्यार्थ्यांना २४ पदके प्रदान करण्यात आली.

    यंदा पद्म भूषण पुरस्कार जाहीर झालेले उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक व पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले डॉ झहीर काझी व उदय देशपांडे हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.