विमान वाहतूक व्यवसायातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग – राज्यपाल चे. विद्यासागर राव
वृ.वि.163 26 पौष 1940 (सायं. 6.55 वा.)
महान्यूज दि. 16 जानेवारी, 2019
विमान वाहतूक व्यवसायातून
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग
– राज्यपाल चे. विद्यासागर राव
मुंबई, दि. 16 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे ध्येय निश्चित केले आहे, या ध्येयाच्या पूर्तीसाठी शेतकऱ्यांचे तसेच किरकोळ उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यात विमान वाहतूक व्यवसायाचा मोठा हातभार लागणार आहे, असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले. ग्लोबल एविएशन समिट या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारोहात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू, राज्यमंत्री जयंत सिन्हा उपस्थित होते.
राज्यपाल पुढे म्हणाले, जागतिक विमान वाहतूक उद्योग जलद गतीने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेने 2030 पर्यंत जागतिक हवाई प्रवाहात 100 टक्के वाढीची भविष्यवाणी केली आहे. देशातील विमान वाहतूक उद्योग वाढीसाठी शासनाने अनेक चांगले पुढाकार घेतले आहेत. देशातील विमान वाहतूक व्यवसाय हा अर्थव्यवस्था वाढीतील एक प्रमुख घटक आहे. गेल्या चार वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात नागरी हवाई वाहतूक आणि रिजनल कनेक्टिव्हीटीचे महत्वपूर्ण धोरण आखले गेले आहे. शिर्डीवरुन विमान सेवेचे लोकार्पण करण्यात आले आहे.
पुढील दोन दशकात भारतातील हवाई वाहतुकीचे चित्र बदलणार आहे, सध्या असलेली 187 दशलक्ष प्रवाशांची संख्या दरवर्षी 1.12 अब्ज प्रवाशांनी वाढणार आहे. यासाठी आवश्यक असणारे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि अद्ययावतेमध्ये गुंतवणुकीसाठी प्रचंड संधी खुल्या होणार आहेत. विमान वाहतूक उद्योगासाठी कुशल मनुष्यबळाची देखील मोठ्या प्रमाणात आवश्यकता लागणार आहे. पर्यटन वाढीसाठीही विमान वाहतूक व्यवसाय महत्वाचा ठरणार असणार आहे. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी राज्य शासनाने केलेल्या आयोजनांचेही राज्यपालांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना श्री. प्रभू यांनी परिषदेत मिळालेल्या सूचना आणि सल्ले भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी उपयुक्त ठरतील असे सांगितले. ते म्हणाले, भारताला विमान वाहतुकीचे हब बनविण्यासाठी वाटचाल सुरु करण्यात आली आहे. एअर कार्गो धोरण, ड्रोन धोरण यासारख्या महत्वपूर्ण विषयावर सुमारे ८३ देशातील लोकांनी आपले विचार व्यक्त केले. या परिषदेतून ‘प्रत्येकासाठी उडान’ हे स्वप्न साकार करण्याची दिशा ठरविण्यात आली आहे.
राज्यमंत्री सिन्हा यांनी विमान वाहतूक क्षेत्रात देश जगातील पहिल्या तीन क्रमांकात कायम अग्रेसर राहील, असे सांगितले. विमान निर्मितीच्या क्षेत्रात देशाचे योगदान वाढविण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
यावेळी “मेकिंग इंडिया द नेक्स्ट एविएशन हब” या मिशन वाक्याचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.