बंद

  योगा ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

  प्रकाशित तारीख: December 28, 2018

  महान्यूज

  वृ.वि. 4049

  7 पौष 1940 (दु. 2.55 वा.) दि. 28 डिसेंबर, 2018

  योगा ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी

  – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

  मुंबई दि. 28 : योगा ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून योगामुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्व जोडण्याचे काम होत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काढले.

  योग प्रशिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती राम नाथ कोविंद उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी येणाऱ्या काळातही या संस्थेने मानवी जीवनाच्या विकासात योगदान देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावे अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासह राष्ट्रपतींच्या पत्नी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, योगा इन्स्टिटयूटच्या संचालक डॉ. हंसाजी जयदेव, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

  राष्ट्रपती म्हणाले, मुंबई देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी आहे. आज येथे मनुष्य जीवनाच्या संबंधित सर्व कला, संस्कृती, विज्ञान,अध्यात्म आदींच्या अभ्यासासोबत योग विद्येचा अभ्यास देखील प्रामुख्याने होतो. योग विद्येच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक महान व्यक्तीने आपले मोलाचे योगदान दिले आहेत. आज या संस्थेला १०० वर्ष पूर्ण झाली असली तरी येणाऱ्या काळात या संस्थेला समाजाच्या संतुलित विकासासाठी, आरोग्यासाठी योगदान द्यायचे आहे. मला आनंद वाटतो की ट्रक चालकांसाठी ट्रक आसन निर्माण केले. योग हे शरीर मन आणि आत्मा यांना जोडण्याचे काम करत असून आज योग हा आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वीकारला गेला आहे.

  दादाभाई नवरोजी यांचे योग इन्स्टिटयूटच्या निर्माणासाठी महत्वपूर्ण योगदान

  राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले, आधुनिक भारतात लोकतंत्र चिरायु होण्यासाठी अनेक महापुरुषाने काम केले आहे त्यापैंकी एक नाव म्हणजे दादाभाई नवरोजी, हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांचे अनेक क्षेत्रात मोलाचे सहकार्य लाभले आहेत. तसेच योग इन्स्टिट्यूटच्या निर्माणासाठी दादाभाई नवरोजी यांचे प्रमुख योगदान लाभले आहे यामुळे या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना श्रद्धापूर्वक श्रध्दांजली वाहतो.

  योगा सर्व वयोगटासाठी उपयुक्त

  योगा इन्स्टिट्यूटने १९३४ मध्ये एक पुस्तक प्रकाशित केले होते ज्यामध्ये सामान्य घरगुती जीवन जगणाऱ्या लोकांसाठी योग विद्या अधिक सुलभ करून देण्यात आली होती, यामध्ये महिलांसाठी उपयुक्त आसनांचा समावेश होता अशा प्रकारे सुज्ञ युवक, बालक,वयस्कर नागरिकांसाठी हे पुस्तक उपयुक्त होते. योग अभ्यास प्रत्येकाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी लाभदायक आहे. २०१५ पासून आपण दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करत असल्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आपल्या भाषणात म्हणाले.

  योगविद्या मानवतेची साधनाच

  राष्ट्रपती यावेळी म्हणाले, योगविद्या म्हणजे मानवतेची साधना आहे या विद्येमध्ये सर्व देशांना आपल्यासोबत जोडण्याचे सामर्थ्य आहे. योगविद्येच्या जडणघडणीसाठी भारत सरकार कटिबद्ध असून या विद्येला फक्त भारतासाठी सीमित न ठेवता भारताबाहेर नेऊन ठेवले आहे आणि व्यापक रूप दिले आहे. यावर्षी योग साधनेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल अनेक युवक आणि युवतींना पद्मश्री हा बहुसन्मानीत पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

  योग विद्या ही जीवन जगण्याची कला

  योग विद्या कोणत्याही संप्रदाय, जाती धर्माची नाही तर योग विद्या ही जीवन जगण्याची कला आहे. योग विद्या आत्मसात असल्याने आपण आपले मन, शरीर आणि पूर्ण व्यक्तिमत्व विकसीत करू शकतो. देशातील नवीन पिढीला योग विद्येचे ज्ञान मिळावे म्हणून अनेक राज्यात योग विद्येचे धडे शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सामावण्यात आले आहेत. आजची आपली जीवनशैली पाहता आपण सर्वांनी योगविद्येचा फायदा घेतला पाहिजे, असेही राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले.

  योगविद्या करते शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्याचे काम

  यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आज अती प्राचीन असलेल्या योगविद्येला संपूर्ण विश्वाने स्वीकारले असून, आता तर योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. गेल्या 100 वर्षात या संस्थेने योगविद्या घराघरात पोहोचून लोकांना स्वस्थ ठेवण्याचे काम केले असून येणाऱ्या काळातही या संस्थेने समाजाच्या विकासासाठी आणि स्वस्थ आरोग्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. योगविद्या फक्त शरीर नाही तर मन स्वस्थ ठेवण्याचे काम करते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे स्वास्थ चांगले असते तेव्हा त्याच्या परिवाराचे स्वास्थ्य चांगले राहते आणि जेव्हा परिवाराचे स्वास्थ्य चांगले असते तेव्हा देशाचे स्वास्थ्य उत्तम होते अशाप्रकारे योग विद्येच्या साधनेने संपूर्ण विश्व स्वास्थ्य जीवनाचा लाभ घेऊ शकतात.

  केंद्रीय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यावेळी म्हणाले, आजची जीवनशैली पाहता योग शिकणे महत्वाचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत, स्वस्थ भारत चा नारा दिला आहे. स्वस्थ भारत हे उद्धिष्ट साध्य करताना योग अंगीकारणे आवश्यक आहे.

  योग इन्स्टिट्यूटच्या संचालक हंसाजी जयदेव योगेंद्र यांच्या ‘योगा फ़ॉर ऑल’ पुस्तकाचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध संतूर वादक राहुल शर्मा यांच्या संतूर वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 100 वर्षांची परंपरा असलेल्या योग प्रशिक्षण संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास माहितीपटाद्वारे दाखविण्यात आला.