बंद

  महाराष्ट्र राज्याच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील भाषण

  प्रकाशित तारीख: May 1, 2016

  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 56 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री. चे. विद्यासागर राव यांचा रविवार, 1 मे 2016 रोजी शिवाजी पार्क, मुंबई येथील संदेश.

  बंधु आणि भगिनींनो,

  1. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 56 व्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी मी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देतो. तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने सर्व कामगारांना देखील मी शुभेच्छा देतो.

  2. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांना मी आदरांजली वाहतो.

  3. राज्याने मागील 56 वर्षांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे.

  4. हा दिवस आपण साजरा करीत असलो तरी, मला दु:ख होते की, महाराष्ट्र सलग चौथ्या वर्षी तीव्र दुष्काळाचा सामना करीत आहे. सुमारे 28,662 इतकी गावे दुष्काळग्रस्त झाली आहेत. शासनाने राज्यातील 38 लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 2750 कोटी रुपये इतकी रक्कम जमा केली आहे आणि 3,351 इतक्या गावांना आणि 5,402 इतक्या वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यासाठी 459 कोटी इतका अतिरिक्त खर्च केला आहे. त्याव्यतिरिक्त चारा छावण्यांकरीता 171 कोटी इतका निधी राखून ठेवण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळ निवारण उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने देखील सुमारे 3,049 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

  मराठवाडा आणि विदर्भ या प्रदेशातील 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना प्रतिकिलो 2 रुपये दराने गव्हाचा आणि प्रतिकिलो 3 रुपये दराने तांदूळाचा पुरवठा करण्यात येत आहे.

  माझे शासन 1.34 लक्ष शेतकऱ्यांना वित्तीय सुरक्षितता पुरविण्यासाठी एकूण 20,000 कोटी रुपये इतक्या रकमेचा विमा देण्यास प्रयत्नशील असेल.

  माझे शासन, दुष्काळग्रस्त लातूरला “जलदूत” पाण्याच्या रेल्वे गाडीच्या मदतीने पिण्यास योग्य असे पाणी पुरवीत आहे.

  माझ्या शासनाची पथदर्शी योजना असलेली “जलयुक्त शिवार योजना” राज्यभर जोमाने राबविण्यात येत आहे. माननीय प्रधान मंत्री यांनी या योजनेचा गुणगौरव केला आहे. मला हे नमूद करताना आनंद होतो की, राजस्थान व तेलंगाणा शासनाने आपापल्या राज्यात ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

  5. माझ्या शासनाने, शाश्वत शेतीस उत्तेजन देणारी, ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना घोषित केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 52,000 इतकी शेततळे निर्माण करण्यात येतील.

  6. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 2016-2017 या वर्षाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आला आहे आणि हे वर्ष “शेतकरी स्वाभिमान वर्ष” म्हणून साजरे करण्यात येत आहे. शेती आणि शेतीशी संलग्न कामासाठी 25,000 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

  7. मला सांगताना आनंद होतो की, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करून सुरू झाले आहे.

  8. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी करण्याचा एक भाग म्हणून नागपूर येथील दीक्षाभूमीस ‘अ’ श्रेणी तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. आंबवडे येथे देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. शासन, मुंबई येथील इंदुमिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यास कटिबद्ध आहे.

  मला हे सांगताना आनंद होतो की, सामाजिक बहिष्काराची प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी, “महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) विधेयक 2016” याचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

  9. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला ‘मेक इन इंडिया सप्ताह’ मोठ्याप्रमाणात यशस्वी झाला आहे. मला हे नमूद करताना आनंद होतो की, राज्यामध्ये 8 लाख कोटी रुपयांच्या अपेक्षीत गुंतवणूकीमधून 30 लाख व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता निर्माण होणार आहे.

  10. मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्रामध्ये रुपांतर करण्याच्या दृष्टीने, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आगामी आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र म्हणून स्थिरावत असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलास अधिक सुसज्ज करण्यासाठी 171 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  11. मला हे नमूद करताना आनंद होतो की, अर्थसहाय्यित एल.पी.जी. प्रत्यर्पित करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रेसर आहे. आतापर्यंत 16.42 लाख इतक्या व्यक्तींनी स्वेच्छेने अर्थसहाय्य सोडून दिले आहे.

  12. हे सांगताना मला आनंद होतो की, राष्ट्रीय पंचायतराज दिनाच्या प्रसंगी, पंचायतीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण व ते अधिक सशक्त करण्याबद्दल महाराष्ट्राला पंचायत राजचा दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.

  13. मला हे नमूद करताना आनंद होतो की, शासनाचे ‘आपले सरकार’ हे वेब पोर्टल आता सर्व जिल्ह्यांकरिता उपलब्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये 319 अधिसूचित सेवांपैकी 156 पेक्षा अधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि उर्वरित अधिसूचित सेवा 2 ऑक्टोबर 2016 पर्यंत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येतील.

  14. मला सांगताना आनंद होतो की, ‘स्वच्छ भारत अभियान’ याअंतर्गत ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत आहे त्याला गती मिळालेली आहे. शासन प्राथम्याने राज्यास हागणदारीमुक्त करणार आहे आणि घन कचऱ्याचे परिणामकारक व्यवस्थापन करणार आहे.

  15. 2015-16 या वर्षामध्ये 4,40,000 हून अधिक शौचालये बांधण्यात आली असून 5,276 गावे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली आहेत.

  बंधू आणि भगिनींनो,

  16. महाराष्ट्रात पर्यटनास भरपूर वाव असून शासनाने, राज्यातील पर्यटन वाढीच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी शासनाने नवीन पर्यटन धोरण घोषित केले आहे.

  17. राज्यातील वन क्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने, शासनाने 1 जुलै 2016 रोजी ‘कृषि दिना’ च्या निमित्ताने 2 कोटी रोपं लावण्याची महत्त्वाकांक्षी योजना घोषित केली आहे.

  18. शासनाने, पोलीस दलाच्या तंत्रज्ञानात्मक दर्जावाढ करण्याच्या कार्यक्रमास गती दिली आहे. त्यादृष्टीने गुन्हेगारी शोधन जाळे व शोध यंत्रणा (Crime and Criminal Tracking Network System-CCTNS) तसेच सीसीटीव्ही प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत.

  महिला व बालकांची सुरक्षितता हा माझ्या शासनाचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. महिला व बालकांमध्ये विश्वास व सुरक्षा निर्माण करण्यासाठी 90 महिला पोलीस गस्त पथके नेमली आहेत.

  19. राज्याने प्रगती व विकासाकडे सातत्याने वाटचाल सुरु ठेवली आहे. चेतनामय, प्रगतीशील व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी नागरीकांनी शासनास सहकार्य करावे असे मी त्यांना आवाहन करतो.

  जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!