बंद

  २६.०१.२०२० प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मुख्य समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

  प्रकाशित तारीख: January 26, 2020

  मुंबई : शहरांच्या विकासाबरोबरच शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण देखील महत्त्वाचे आहे. राज्यात विकासाच्या नियोजनात पर्यावरणपूरक बाबींवर भर देण्यात येईल. एकदाच वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू यावर बंदी घातली असून या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. आता आपले राज्य प्लॅस्टिकमुक्त, कचरामुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभात ते बोलत होते. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या सत्तराव्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपले संपूर्ण भाषण मराठी भाषेतून केले.

  राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, कचऱ्याचे संकलन, वाहतूक, ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया यासाठी सुविधा निर्माण करण्यात येत आहे. साठलेल्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी तेरा शहरांमध्ये पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाले आहेत. राज्यातील कचरामुक्तीसाठी राज्यस्तरीय एकत्रित आराखडा तयार करण्याच्या तसेच राज्यातील सर्वच शहरांमध्ये अमृत वन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

  आदिवासी रेला नृत्याने जिंकली मने
  ध्वजवंदनानंतर विविध विभागांच्या चित्ररथांचे सादरीकरण तसेच विविध दलांचे संचलन झाले. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील रेला नृत्य संघाने सादर केलेल्या आदिवासी नृत्याने सर्वांची मने जिंकली. सुमारे ६०-७० कलाकारांच्या या समुहाने आकर्षक आणि पारंपारिक पद्धतीने आदिवासी रेला नृत्य सादर केले. गडचिरोली पोलीस दलाने आदिवासी बांधवांच्या नृत्यकलेस वाव मिळवून देण्यासाठी गेल्यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात रेला नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. त्यात जवळपास ३० हजार आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या संघाला आज राज्याच्या मुख्य सोहळ्यात पाचारण करण्यात आले होते. त्यात सर्वच कलाकारांनी बहारदार सादरीकरण करुन मान्यवरांसह उपस्थितांची मने जिंकली.

  सांस्कृतिक कार्य विभागाने कान्होजी आंग्रे ‘स्वराज्याचे पहिले सरखेल’ हा चित्ररथ सादर केला. शिवरायांनी स्थापन केलेल्या आरमाराची धुरा स्वत:च्या शिरावर घेणारे पहिले ॲडमिरल, ब्रिटीश, डच आणि पोर्तुगीज यांच्याविरुद्ध लढणारे शूर दर्यावादी कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची ओळख करुन देणाऱ्या या चित्ररथाने व त्यावरील सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले.

  ‘सर है सलामत तो पगडी हजार’ आणि ‘चला मुलींनो खेळुया’
  वाहतुक पोलीसांचा रस्ता सुरक्षेचा संदेश देणारा चित्ररथ लक्षवेधी ठरला. ‘सर है सलामत तो पगडी हजार’ असा संदेश देत त्यांनी मोटारसायकल चालविताना न विसरता हेल्मेट वापरा आणि अपघातांपासून सुरक्षीत रहा असा संदेश दिला. क्रिडा विभागाच्या ‘चला मुलींनो खेळुया’ या चित्ररथाने मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला. या चित्ररथावर विविध क्रिडा स्पर्धातील पदकविजेते सहभागी झाले होते. मुलींनी मल्लखांब, जिम्नॅस्टीकसह विविध क्रिडा प्रकारांचे सादरीकरण केले.

  याबरोबरच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, वन विभाग, एमएमआरडीए, पर्यावरण, उर्जा, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, सामाजिक न्याय, जलसंपदा यांच्या चित्ररथांनीही संचलनात सहभाग घेऊन विविध प्रकारचा संदेश दिला.

  पोलीस अश्वदलाचे प्रथमच संचलन
  यावेळी विविध सैन्य दल, पोलीस दल, अग्निशमन दल, वन विभाग, सुरक्षा रक्षक मंडळे, ब्रास बॅन्ड पथक, पाइप बँड पथक, छत्तीसगड पोलीस, गडचिरोली व गोंदीया जिल्ह्यांचे सी-६० पथक यांच्यासह पोलीस दलात नव्यानेच समाविष्ट होत असलेल्या बृहन्मुंबई पोलीस अश्वदलानेही संचलन केले. काळाचौकीतील शिवाजी विद्यालय आणि दादर येथील सेंट पॉल हायस्कूलमधील मुलांच्या रोड सेफ्टी पेट्रोल दलाने संचलन केले. तसेच दादर येथील सेंट पॉल कॉनव्हेंट हायस्कूल, दहिसरच्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल आणि मालाड येथील पुष्पा पार्क टोपीवाला लेन येथील महापालिका शाळेमधील मुलींनीही त्यांच्या रोड सेफ्टी पेट्रोल दलाचे सादरीकरण केले. राष्ट्रीय सेवा योजना, सी कॅडेट, भारत स्काउट आणि गाइडस्‌च्या मुला-मुलींनीही संचलनात सहभागी होत सादरीकरण केले.

  गरीब आणि गरजूंसाठी शिवभोजन योजना

  संत गाडगे बाबांच्या ‘भुकेल्यांना अन्न | तहानलेल्यांना पाणी | बेकारांना रोजगार | दुःखी व निराशांना हिम्मत || या शिकवणीचा उल्लेख करुन राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, आजपासून शिवभोजन योजनेला प्रारंभ होत आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. गरीब आणि गरजू व्यक्तीला केवळ दहा रुपयांमध्ये आहार देण्याला आज सुरुवात होईल. जिल्हा मुख्यालयाची ठिकाणे व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ही योजना सुरु होत असून टप्प्याटप्प्याने ही योजना राज्यात राबविण्यात येईल. गरजू व्यक्तींना किफायतशीर दरात जेवण मिळण्याचा हा अभिनव उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, अडचणीत असलेल्या बळीराजाला कर्जमुक्त करण्याबरोबरच चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. याकरिता ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ लागू केली आहे. राज्यात पीक विमा योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासंदर्भात शासनाने मंत्रीमंडळ उपसमिती गठीत केली आहे.

  स्मारके प्रेरणादायी ठरतील

  आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यास महाराष्ट्र शासन बांधील आहे. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला शासन गती देत असून प्रस्तावित स्मारकाच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्याय तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल.

  महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असून या पुढील काळात उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण करण्याला प्राधान्य असेल. शेती, शिक्षण, रोजगार या क्षेत्रामध्ये उद्योजकांच्या योगदानाने अमूलाग्र बदल घडविण्याचा शासनाचा मानस आहे. ‘केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार’ या मराठी सुविचाराचा उल्लेख करुन राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, राज्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ आणि वन विकास महामंडळ यांची एक संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. वन पर्यटनाचा विकास करून रोजगारामध्ये वाढ करण्यात येईल.