बंद

  चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी केले राज्यपालांच्या पुस्तकाचे प्रकाशन

  प्रकाशित तारीख: November 5, 2018

  राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून केलेल्या कार्याचा सचित्र लेखाजोखा असलेल्या एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी राजभवन येथे झाले.

  मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्याच्या परंपरेला फाटा देत राज्यपालांनी आपल्या पुस्तकाचे प्रकाशन राजभवनातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या हस्ते केले.

  यावेळी राज्यपालांसह त्यांच्या पत्नी विनोदा, राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, तसेच राजभवनाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

  ‘जर्निंग टूवर्डस न्यूअर माईलस्टोन्स’ या राज्यपालांच्या सचिवालयाने तयार केलेल्या कॉफी टेबल पुस्तकामध्ये राज्यपालांनी उच्च शिक्षण, आदिवासी विकास, वैधानिक विकास मंडळे इत्यादी क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा आढावा घेण्यात आला आहे.

  याशिवाय राजभवन लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राजभवन जनतेसाठी खुले करण्याचा उपक्रम, राजभवन येथील भुयारी बंकरचे नुतनीकरण करून त्याठिकाणी संग्रहालय तयार करण्याची योजना, राजभवनाचे रुपांतर हरित राजभवनात करण्यासाठी सौर उर्जेच्या वापरला चालना देणे, इत्यादी विषयांवर देखील पुस्तकामध्ये माहिती देण्यात आली आहे.

  तामिळनाडू राज्याच्या राज्यपालपदाचा एक वर्ष कार्यभार असताना विद्यासागर राव यांनी त्या राज्यात केलेल्या कार्यावर आधारित प्रकरणाचा देखील पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे.

  राजभवनाचे माळी चंद्रकांत कांडले, जमादार विलास मोरे, कक्षसेवक इफ्तेखार अली, खानपान सेवा विभागातील कर्मचारी संजय पर्‍याड, मुरुगन, कैलास शेलार, स्वच्छता मुकादम लक्ष्मी हडळ तसेच शिपाई निलिमा शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.