बंद

  ऑस्ट्रिया महाराष्ट्राला पर्यटन विकासात मदत करेल : ब्रिगीट ओप्पिंगर वालशोफर

  प्रकाशित तारीख: October 7, 2018

  ऑस्ट्रिया महाराष्ट्राला पर्यटन विकासात मदत करेल : ब्रिगीट ओप्पिंगर वालशोफर

  ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत ब्रिगीट ओप्पिंगर वालशोफर यांनी शनिवारी (दिनांक ६) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. महाराष्ट्रात पर्यटनाच्या अनेक संधी दिसत असल्याचे सांगून ऑस्ट्रिया राज्याला पर्यटन विकास तसेच पर्यटन उद्योगाला चालना देण्यास मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिले. या संदर्भात महाराष्ट्राने ऑस्ट्रियातील पर्यटन कंपन्यांना पाहणीसाठी निमंत्रित करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

  ऑस्ट्रियाकडे प्रगत केबल कार तंत्रज्ञान असून आपल्या देशातील केबल कार कंपन्या महाराष्ट्रातील गडकिल्ले तसेच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आधुनिक सुविधा देऊ शकतील असे राजदूतांनी सांगितले.

  महाराष्ट्र व ऑस्ट्रिया या देशांमध्ये विद्यापीठ स्तरावर सहकार्य वाढविण्याच्या राज्यपालांच्या सूचनेचे स्वागत करताना श्रीमती ब्रिगीट ओप्पिंगर वालशोफर यांनी आपण राज्यातील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठासोबत सहकार्य करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करू असे सांगितले.

  ऑस्ट्रिया अत्युच्च तंत्रज्ञान उपकरणे तयार करण्याच्या क्षेत्रात अग्रेसर असून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात देखील आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.

  पर्यटन क्षेत्रात असेच संस्कृत विद्यापीठ सहकार्य करण्याच्या राजदूतांच्या वक्तव्याचे स्वागत करतांना राज्यपालांनी या संदर्भात पाठपुरावा करण्याची ब्रिगीट ओप्पिंगर वालशोफर यांना सूचना केली.