अमेरिका, पोलंडच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हीड रॅन्झ तसेच पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी शुक्रवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे स्वतंत्रपणे सदिच्छा भेट घेतली.
अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत या नात्याने भारत व अमेरिकेतील विविध क्षेत्रातील संबंध सुदृढ करताना व्यापार व गुंतवणूक वाढविण्याबद्दल आपण विशेष प्रयत्नशील असल्याचे डेव्हीड रॅन्झ यांनी राज्यपालांना सांगितले.
भारतातील दोन लाख विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत असून ही संख्या अधिक वाढावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अलिकडेच झालेल्या भेटीमुळे उभय देशांमधील संबंध अधिक मजबूत झाले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
भारत – पोलंड थेट विमानसेवा सुरु होणार
पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी देखील शुक्रवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
भारत आणि पोलंड दरम्यान थेट विमान सेवा सुरु झाल्यास उभय देशातील प्रवासाला लागणारा वेळ कमी होऊन व्यापार, उद्योग व पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यामुळे भारतातून पोलंडला थेट विमानसेवा सुरु करण्याबद्दल प्रयत्न सुरु असल्याचे डेमियन ईरझॅक यांनी सांगितले.
दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंड मधील अनेक निर्वासित मुले भारतात आली होती व कोल्हापूर येथे त्यांना राजाश्रय मिळाला होता, असे डेमियन ईरझॅक यांनी सांगितले. येथे राहून गेलेल्या लोकांपैकी काही लोक आज नव्वदीपार झाले आहे. त्यांचे साठी कोल्हापूर स्वर्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातून युरोपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे, परंतु पोलंडला फार कमी पर्यटक येतात असे सांगून ही संख्या वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.