बंद

    श्री. कोना प्रभाकर राव (31.05.1985 – 02.04.1986)

    श्री. कोना प्रभाकर राव
    एअर चिफ मार्शल आय.एच.लतिफ यांच्या नंतर ३० मे १९८५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल पद ग्रहण करणाऱ्या श्री.कोना प्रभाकरा राव यांचा जन्म १० जुलै १९१६ ला आंध्र प्रदेश मधील बापटला येथे झाला. त्यांचे बहुतेक शालेय शिक्षण त्यांच्या मूळ गावीच झाले. लॉयला महाविद्यालय, मद्रास येथून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि आय.एल.एस. विधि महाविद्यालय, पुणे येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

    जेव्हा मोतीलाल नेहरू यांचा मृत्यु झाला तेव्हा त्यांनी शाळेच्या बहिष्काराचे आयोजन केले होते. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. त्यांनी तरूणांची संघटना स्थापन करून खादीच्या वापराचा प्रचार केला होता.

    १९४० मध्ये श्री.राव यांनी संयुक्त मद्रास राज्यात बापटला येथे वकिलीच्या व्यवसायास प्रांरभ केला. आंध्र प्रदेश विधानसभेवर सर्व प्रथम ते 1967 मध्ये निवडून गेले आणि नंतर १९७२ व १९७८ मध्ये सुद्धा निवडून गेले. १९८०-८१ या कालावधीमध्ये ते विधानसभेचे सभापती होते. ते एपीसीसी (आय) (आंध्र प्रदेश काँग्रेस समिती (आय)) चे अध्यक्ष होते. श्री.भावना व्यंकटराम आणि श्री.विजया शष्कारा रेड्डी मुख्यमंत्री असताना ते वित्त आणि नियोजन विभागाचे प्रभारी मंत्री होते.

    २ सप्टेंबर १९८३ रोजी श्री.राव यांची पाँडेचेरीच्या ले. राज्यपालपदी नियुक्ती झाली आणि जून १९८४ पर्यंत ते या पदावर होते. १७ जून १९८४ रोजी ते सिक्कीमचे राज्यपाल झाले. कुशल खेळाडू असलेले श्री.राव १९३८ मध्ये मुंबई विद्यापीठाचे टेनिसचे सर्वोत्कृष्ट खेळाडू (चॅम्पियन) होते. त्यांनी बापटला आणि इतर काही ठिकाणी शिवाजी व्यायाम मंडळी स्थापन केली. पुण्यातील महाविद्यालयीन जीवनात ते एक कुस्तीगीर आणि बॅडमिटंन चॅम्पियन होते.

    श्री.राव अनेक सांस्कृतिक संघटनांशी सक्रियरीत्या निगडित होते. त्यांच्या सुरवातीच्या काळात त्यांनी अनेक तेलगु चित्रपटांची निर्मिती केली. तसेच त्यात काम केले व दिग्दर्शनही केले. त्यांतील संस्मरणीय असे चित्रपट म्हणजे मंगळसूत्र, निर्दोषी, द्रोही आणि सौदामिनी.