बंद

    डॉ. पी. सी. अलेक्झांडर (12.01.1993 – 13.07.2002)

    डॉ. पी. सी. अलेक्झांडर

    डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे स्वांतत्र्योत्तर कालखंडातील विख्यात व आदरणीय लोकसेवकांपैकी एक आहेत. विख्यात व आदरणीय अशासाठी की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये उच्चप्रतीची कार्यक्षमता, नि:पक्षपातीपणा व सचोटी हे गुण जोपासलेले आहेत. एक कुशल, मुसद्दी व प्रशासक म्हणून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक जीवनामध्ये अर्धशतकाहून अधिक काळ विविध प्रकारची उच्च पदे भूषवलेली आहेत, जसे –

    • वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार येथे सचिव म्हणून तीन वर्षे;
    • पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून चार वर्षे;
    • लंडन येथे भारताचे उच्चायुक्त म्हणून तीन वर्षे;
    • राज्यपाल म्हणून 11 वर्षाहून अधिक वर्षे (तामिळनाडू 1988-90, यांपैकी एक वर्ष राज्यात राष्ट्रपती राजवट अंमलात होती आणि महाराष्ट्र- जानेवारी 1993 पासून) आणि
    • संयुक्त राष्ट्र नागरी सेवांमध्ये वरिष्ठ पदावर 10 वर्षे

    संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, जिनेव्हा यांचे सहाय्य महासचिव व कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना, श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना आपल्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून रूजू होण्यास बोलावले. इंदिरा गांधी व त्यानंतर राजीव गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून 1981-85 या काळात त्यांनी त्या काळातील अतिशय महत्त्वाच्या विकास कामांमध्ये निर्णायक भूमिका बजावली.

    डॉ.अलेक्झांडर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (भा.प्र.से. 1948) रूजू होण्याअगोदर त्रावणकोर विद्यापीठातून इतिहास व अर्थशास्त्र या विषयांमधील पदव्युत्तर पदवी आणि अण्णामलाई विद्यापीठातून संशोधनाद्वारे एम.लिट. व डी.लिट. या पदव्या संपादन केल्या होत्या. तेव्हाच्या मद्रास व त्रावणकोर-कोचीन राज्यांतील जिल्ह्यांमध्ये काम केल्यानंतर ते 1955 मध्ये केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर दाखल झाले. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय अधिकारी संकोषासाठी निवड झाली तेथपासून त्यांच्या नियत सेवावधीपर्यंत ते भारत सरकारच्या सेवेत विविध हुद्यांवर काम करत राहिले.

    डॉ.अलेक्झांडर यांनी नूफिल्ड फाऊंडेशन फेलोशिपअंतर्गत युनायटेड किंग्डम व्यापार मंडळ येथे प्रशिक्षण घेतले होते आणि फोर्ड फाऊंडेशन फेलोशिपअंतर्गत कॅलिफोर्नीया यु.एस.ए. येथील स्टॅनफोर्ड संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले होते.

    डॉ.अलेक्झांडर यांनी आपल्या शाळा महाविद्यालयांच्या दिवसांत वक्तृत्व व वाद-विवाद यांमध्ये आंतरशालेय व आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सातत्याने पहिले बक्षिस जिंकून आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केले होते. त्रावणकोर विद्यापीठात शिकत असताना ते त्रावणकोर विद्यापीठ वादविवाद संघाचे प्रमुख होते. आंतर-विद्यापीठ वादविवाद स्पर्धांसाठी इतर विद्यापीठांना भेट देण्याकरिता या संघास पाठविण्यात आले होते. 1940 – 41 मध्ये ते त्रावणकोर विद्यापीठ युनियनचे अध्यक्ष होते.

    डॉ. अलेक्झांडर यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये, राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा अनेक विषयांवर भाष्य करणारा ईश्वरी देणगी असलेला व विद्वान वक्ता म्हणून आपल्या श्रोतृसमाजाची स्तुती व प्रशंसा लाभली.

    त्यांना 1999 मध्ये प्रतिष्ठित अशा लोक प्रशासनामधील अग्रगण्य कांची परमाचार्य राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

    डॉ. अलेक्झांडर हे जगभर पसरलेल्या भारतीय विद्याभवनच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीचे एक दशकाहून अधिक काळ सदस्य राहिलेले आहेत आणि एक वर्षापूर्वी त्या समितीचे उपाध्यक्ष व विश्वस्त म्हणून निवडून आले होते. ते जून 1989 पासून केंब्रिज विद्यापीठाच्या नेहरू न्यासाचे अध्यक्ष आहेत.

    डॉ.अलेक्झांडर यांनी अनेक पुस्तके, लेख, शोध निबंध लिहिलेले असून त्यात देखील, वक्ता म्हणून त्यांनी जो लौकिक मिळविला तसाच उच्चश्रेणीचा लौकिक मिळविलेला आहे. त्यांची अलिकडची पुस्तके म्हणजे,

    1. माय इयर्स विथ इंदिरा गांधी
    2. दि पेरील्स ऑफ डेमॉक्रसी
    3. इंडिया इन दि न्यू मिलेनियम

    डॉ.अलेक्झांडर यांनी 13 जुलै 2002 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले.

    दिनांक १० ऑगस्ट २०११ रोजी डॉ.अलेक्झांडर यांचे निधन झाले.