24.07.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत आदिवासी बहुल ‘अनुसूचित क्षेत्रांमधील गावांचा समूह विकास’ या विषयावर बैठक संपन्न
24.07.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्याच्या आदिवासी बहुल ‘अनुसूचित क्षेत्रांमधील गावांचा समूह विकास’ (Cluster Development in Tribal Areas) या विषयावर आदिवासी विकास विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक व्हिडीओकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपन्न झाली. अनुसूचित क्षेत्रांमधील आदिवासी लोकांसाठी उपजीविकेची साधने निर्माण करून त्यांचे स्थलांतर थांबविण्याबाबत पावले उचलावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. विभागाचे अभिनंदन करताना राज्यपालांनी अधिकाऱ्यांना अनुसूचित क्षेत्रांमध्ये शिक्षण व आरोग्य विषयाकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. आदिवासी भागांमधील वनोपज उत्पादनाचे विपणन व पॅकेजिंगवर योग्य पद्धतीने करून उत्पादने खुल्या बाजारात आणण्यास मदत करावी असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ विजय वाघमारे व आदिवासी विकास आयुक्त डॉ लीना बनसोड यांनी सादरीकरण केले. बैठकीला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त निलेश सागर, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, अतिरिक्त आदिवासी आयुक्त, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांचे प्रकल्प अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.