24.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

24.01.2025 : एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर प्रदेश राज्याचा तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेश राज्याचा तसेच दमण, दीव, दादरा – नगर हवेली केंद्र शासित प्रदेश येथील लोकजीवन व संस्कृतीचे राग, ताल व नृत्याच्या माध्यमातून जिवंत दर्शन घडविल्याबद्दल राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठाला २५००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. यावेळी सांस्कृतिक सादरीकरणात सहभागी तळासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय व वाडा येथील डॉ. शांतीलाल धनजी देवशी महाविद्यालय यांना देखील राज्यपालांनी प्रत्येकी २५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केंद्र शासित प्रदेशांचे तारपा नृत्य, उत्तर प्रदेशचे राज्यगीत, चारकुला नृत्य, भक्तीगीत व कव्वाली सादर केले. तेजल चौधरी या विद्यार्थिनीने कथक व ठुमरी सादर केली. कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु अजय भामरे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ सुनील पाटील, संस्कृत संयोजक निलेश सावे, विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.