18.02.2023: राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी संपन्न; मराठीतून घेतली शपथ
18.02.2023: झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी मराठीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) के के तातेड, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित नागरिक उपस्थित होते.