09.09.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सनद प्राप्त होण्यास तसेच वकील म्हणून कारकीर्द सुरु करण्यास १०० वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त चर्चासत्र संपन्न
09.09.2023: राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सनद प्राप्त होण्यास तसेच वकील म्हणून कारकीर्द सुरु करण्यास १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून (1923 – 2023) मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या चर्चासत्राला राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष उदय वारुंजीकर, ‘अधिवक्ता परिषद’ कोकण प्रांताच्या राष्ट्रीय सचिव अंजली हेळेकर आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘चिंतनातील क्रांतिसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर’ तसेच ‘करवीर संस्थान, बॅरिस्टर आंबेडकर आणि कोर्ट कचेरीतील बहिष्कृत’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीला राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. चर्चासत्राचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी)ने, मुंबई विद्यापीठ, बार कौन्सिल आणि अधिवक्ता परिषदेच्या संयुक्त विद्यमाने केले होते.