भाषण :- 20.02.2024 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस साजरा
20.02.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे आज प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत अरुणाचल प्रदेश व मिझोरम या दोन राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा लोक गीत नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या वतीने हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत तसेच विद्यापीठांतर्गत एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान संस्था व सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज मुंबई या महाविद्यालयांचे अधिष्ठाता व विद्यार्थी उपस्थित होते. राज्यपाल बैस यांच्या हस्ते विद्यार्थी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ले. जन. के टी. परनाईक (नि) यांचा अरुणाचल प्रदेश स्थापना दिनानिमित्त व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.