बंद

    महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपालांचे भाषण.

    प्रकाशित तारीख: January 17, 2018

    ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल चे विद्यासागर राव यांचे भाषण. स्थळ: एमएमआरडीए ग्राउंड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई. वेळ: सकाळी १०३० वाजता बुधवार दिनांक १७ जानेवारी २०१८

    श्रीमती पंकजाताई गोपीनाथ मुंडे, ग्राम विकास व महिला – बालकल्याण मंत्री, श्री दादाजी भुसे, राज्यमंत्री, श्रीमती पूनम प्रमोद महाजन, श्रीमती तृप्ती सावंत, आमदार, इतर लोक प्रतिनिधी, श्री असीम गुप्ता, सचिव, ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग, डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण, श्री एच आर दवे, नाबार्ड, श्रीमती आर. विमला, वरिष्ठ शासकीय अधिकारी, सर्व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार विजेत्या महिला, विविध राज्यातून आलेले स्टॉल धारक, बचत गटांचे प्रतिनिधी, माता, भगिनी आणि बंधुंनो,

    नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांना नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

    आज येथे ‘महालक्ष्मी सरस’ला भेट देऊन खूप आनंद वाटला.

    राज्यपाल म्हणून मी अनेक कार्यक्रमांना, जात असतो. परंतु, महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला, भेट देतांना, मला मनापासून आनंद वाटतो.

    माझा जन्म, ग्रामीण भागात झाला. माझे आरंभीक शिक्षण देखील, ग्रामीण भागात झाले. मी शेतकरी कुटुंबात जन्मलो. कालही मी शेतकरी होतो, आजही आहे आणि उद्याही राहीन. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या तुम्हाला भेटताना, मला आपल्या लोकांना भेटल्यासारखे वाटत आहे.

    ‘महालक्ष्मी सरस’ ला भेट देण्याचे हे माझे चौथे वर्ष आहे. मंत्री म्हणून पंकजा ताई मुंडे यांचे देखील हे चौथे वर्ष आहे.

    माझा स्वर्गीय श्री गोपीनाथ जी मुंडे यांचे सोबत चांगला परिचय होता. आम्ही एकत्रपणे पक्षाचे काम केले आहे.

    श्रीमती पंकजा मुंडे आपल्या वडिलांचा समाज- सेवेचा वारसा उत्तमपणे चालवीत आहे.

    त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्राम विकास विभाग करीत असलेल्या उत्तम कामांबद्दल, मी श्रीमती पंकजा ताई मुंडे यांचे, तसेच ग्राम विकास विभागाचे हार्दिक अभिनंदन करतो.

    स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व, त्या माध्यमातून, तयार झालेल्या महिला बचत गटांमुळे, महिलांची सामाजिक-आर्थिक प्रगती झाली आहे, यात शंका नाही.

    एक महिला शिकते, तेंव्हा एक घर साक्षर होते. तसेच, एक महिला आर्थिक दृष्ट्या आत्म निर्भर होते, तेंव्हा एका कुटुंबाचे जीवनमान सुधारते.

    गेल्या पंधरा वर्षांपासून, महालक्ष्मी सरस प्रदर्शन, नियमितपणे भरत आहे. सुरूवातीला पाचशे कारागीर होते. आता जवळ-जवळ दोन हजार कारागीर सहभागी होत आहेत. या पंधरा वर्षांमध्ये ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाची उलाढाल एक कोटी रुपयांवरून, सहा कोटी रुपये इतकी, वाढली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

    परंतु मी समाधानी नाही. आज अॅमॅझोन, फ्लिपकार्ट यांसारख्या, ई – कॉमर्स कंपन्या, आपल्याच देशातील, विविध वस्तू ऑनलाइन विकून, हजारो कोटी रुपये कमावत आहेत. ‘महालक्ष्मी सरस’ ने आता किमान शंभर कोटी रुपये, इतके ध्येय ठेवले पाहिजे.

    प्रत्येक मॉल तसेच डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये, महालक्ष्मी सरस येथील, उत्पादने वर्षभर उपलब्ध झाली पाहिजे. येथील सर्व पदार्थ तसेच उत्पादनांचे पॅकेजिंग, ब्रँडींग व मार्केटिंग झाले पाहिजे. त्यामुळे शेतकरी, कामगार, महिला तसेच कारागीर यांना योग्य आर्थिक मोबदला मिळेल॰

    भारतात आयुर्वेदिक उत्पादने, बांबू फर्निचर, organic food, यांना खूप मागणी आहे. पुरुष व स्त्रियांचे, रेडिमेड कपडे, यांना देखील मोठी मागणी आहे. खादी कपडे आजकाल फॅशन म्हणून वापरतात.

    माझी एक सुचना आहे.

    दरवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे महाराष्ट्र दिवस, या तीन दिवशी, राज्यातील सर्व लोकांनी, केवळ खादी कपडे वापरावेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कारागिरांना, मोठी मदत होईल.

    श्रीमती पंकजा मुंडे यांना माझी एक विनंती आहे. राज्यातील प्रत्येक एअरपोर्ट, रेल्वे स्थानक तसेच बस स्टॅंड वर, ‘महालक्ष्मी सरस’ चे स्टॉल सुरु करावे.

    ‘महालक्ष्मी सरस’ हे निव्वळ प्रदर्शन नाही. तर महालक्ष्मी सरस, हा, गरीब लोकांकरिता, ग्रामीण जनतेकरिता व आदिवासी लोकांकरिता खरा ‘समृद्धी महामार्ग‘ आहे. या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी, ग्राम विकास विभागाने, पुढाकार घ्यावा, असे मला वाटते.

    आज येथे, राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्राप्त केलेल्या सर्व महिला बचत गटांचे मी हार्दिक अभिनंदन करतो, आणि प्रदर्शनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो.

    धन्यवाद.

    जय हिंद !! जय महाराष्ट्र !!

    ***