19.04.2026: विकसित भारताच्या संकल्पात पालघरचा सहभाग अनिवार्य – राज्यपाल
विकसित भारताच्या संकल्पात पालघरचा सहभाग अनिवार्य
– राज्यपाल जिष्णू देव वर्मा
डहाणूत आरोग्य सुविधांचे लोकार्पण
पालघर दि. १९(जिमाका): भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करताना समाजातील अंतिम घटकाचा विकास करणे व त्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज डहाणू येथे केले.
मार्च 2026 मध्ये राज्याच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यपालांचा हा पहिलाच पालघर जिल्हा दौरा असल्याने पालघरवासियांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अक्षय्य तृतीया आणि भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्याद्वारे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त लाडूलाल सोनी, योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आपल्या भाषणाची सुरुवात ‘सर्वे भवन्तु निरामय:’ या मंत्राचा उल्लेख करीत त्यांनी केली व आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता त्या दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हा आपला मुख्य संकल्प आहे. पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात रोजगार, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पालघरमध्ये एक ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन एक सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या भूमिकेचा संदर्भ देत, राज्यपाल म्हणाले की, विकासाच्या प्रक्रियेत ‘अंत्योदय’ म्हणजेच रांगेतील शेवटच्या माणसाला प्राधान्य देणे आमचे कर्तव्य आहे. वन बंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात फिरता दवाखाना, रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. चांगले इंजिनिअर, तंत्रज्ञ किंवा सनदी लेखापाल होणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्यापेक्षा समाजात चांगला नागरिक म्हणून कार्य करणे ही त्याहून मोठी गोष्ट असल्याचे सांगून पीडितांची सेवा करणे हाच खरा स्वर्ग असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्गम भागातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी लोकभवनाचे दरवाजे सदैव उघडे राहतील आणि पालघरच्या विकासासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली.
वन बंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडू लाल सोनी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ट्रस्टच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या आरोग्य प्रकल्पांची माहिती देऊन आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ट्रस्ट कटिबद्ध असल्याचे सांगितले.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासकीय आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचे चित्र कसे बदलता येईल, यावर प्रकाश टाकला.
पालघरच्या जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यातील आरोग्य सद्यस्थिती आणि राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांविषयीची माहिती दिली. तसेच, राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन अधिक वेगाने कार्य करेल, अशी ग्वाही दिली.