19.02.2025: गोयास (ब्राझील) गव्हर्नर यांचे कृषी, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे आवाहन

गोयास (ब्राझील) गव्हर्नर यांचे कृषी, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे आवाहन
ब्राझील येथील गोयास राज्याचे गव्हर्नर रोनाल्डो रामोस कैआडो यांनी बुधवार (१९ फेब्रुवारी) महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.
गोयास राज्याच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह आलेल्या गोयास गव्हर्नर कैआडो यांनी यावेळी महाराष्ट्र राज्याशी कृषी, ऊर्जा संक्रमण, व्यापार आणि इतर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर चर्चा केली.
बैठकीला मुंबईतील ब्राझीलचे वाणिज्यदूत जोआओ डी मेंडोन्सा लिमा नेटो, गोयास राज्याचे उद्योग आणि वाणिज्य सचिव जोएल दा संत’अन्ना ब्रागा फिल्हो; कृषी, पशुधन आणि पुरवठा सचिव पेड्रो लिओनार्डो डी पॉला रेझेंडे; आरोग्य सचिव रासिव्हेल डोस रीस सॅंटोस ज्युनियर; इंडो-ब्राझीलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक आणि सरचिटणीस पाउलो अझेवेडो, इंडो-ब्राझीलियन चेंबरचे नवे व्यवसाय संचालक नरेंद्र पाटील हे उपस्थित होते.
गोयास गव्हर्नर कैआडो यांनी आपल्या भारत भेटीबद्दल समाधान व्यक्त करताना दिल्ली आणि मुंबई येथे झालेल्या बैठकींमध्ये झालेल्या फलदायी चर्चा झाल्याचे सांगितले.
गव्हर्नर कैआडो यांनी यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची लक्षणीय प्रगती झाली असून देश जागतिक शक्ती म्हणून उदयास आल्याचे त्यांनी नमूद केले. ब्राझील भारताच्या कामगिरीने आणि जागतिक क्षेत्रात त्याच्या नेतृत्वाच्या भूमिकेने प्रेरित आहे, असे त्यांनी सांगितले.
कृषी, ऊर्जा व व्यापार क्षेत्रात भारत व ब्राझील यांनी एकत्रित काम केल्यास चीनसारख्या देशांवर असलेले अवाजवी अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत होईल असे गव्हर्नर कैआडो यांनी सांगितले.
त्यांनी इथेनॉल उत्पादन आणि मिश्रणाच्या बाबतीत ब्राझीलच्या प्रगतीची माहिती दिली.
ब्राझीलमध्ये एकूण जमिनीच्या केवळ १० टक्के जमीन शेतीसाठी वापरली जात असली तरी देखील ब्राझील दरवर्षी ३०० दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी संशोधन आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण दोन्ही राष्ट्रांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.
गोयासमध्ये ब्राझीलचा मोठा औषधनिर्माण उद्योग असून तो सक्रिय औषध घटक (एपीआय) आयातीसाठी भारतावर अवलंबून असल्याचे सांगून महाराष्ट्र आणि गोयासमधील औषध निर्माण क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
राज्यपाल कैआडो यांनी वस्त्रोद्योग आणि त्याच्या उत्पादन निर्मितीमध्ये रस असल्याचे सांगितले. भारतीय कापड आणि पारंपारिक पोशाख ब्राझीलमध्ये, विशेषतः महिलांमध्ये विशेष लोकप्रिय असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.
गव्हर्नर कैआडो यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांना ब्राझीलमधील गोयासला भेट देण्याचे आमंत्रण दिले. आपल्या भेटीमुळे दोन्ही प्रदेशांमधील घनिष्ठ संबंध दृढ होतील असे त्यांनी सांगितले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी ब्राझीलच्या शिष्टमंडळाचे आभार मानले आणि बळकट तसेच परस्पर फायदेशीर संबंध वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या निरंतर प्रयत्नाबाबत त्यांना आश्वस्त केले.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी इथेनॉलमधील ब्राझीलच्या प्रगतीचे कौतुक केले. कैआडो यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना भारत अणुऊर्जेच्या बाबतील मोठे प्रकल्प न घेता लहान व सुरक्षित अणुभट्ट्यांवर लक्ष केंद्रित करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारताने सौर, पवन आणि अणुऊर्जेमध्ये प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी महाराष्ट्रातील मुंबईला झोपडपट्टीमुक्त शहर बनवण्याची योजना, वाधवान येथील भारतातील सर्वात खोल बंदराचा विकास तसेच बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेन या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची गोयास गव्हर्नर यांना माहिती दिली. या विकासामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत आणि ब्राझीलमधील व्यापार आता १५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाराला चालना देण्यासाठी आणि व्यावसायिकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी मुंबई आणि ब्राझील दरम्यान थेट हवाई संपर्क स्थापित करण्याची आवश्यकता असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी अधोरेखित केली. या संदर्भात ब्राझीलच्या वाणिज्यदूतांशी समन्वय सुरू राहील असे त्यांनी सांगितले.