17.10.2024: राज्यपालांच्या हस्ते जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न
राज्यपालांच्या हस्ते जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न
सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, बायोएनर्जी क्षेत्रांत राज्य आघाडीवर : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
‘शाश्वत विकासासाठी हरित व नवीनीकरणीय ऊर्जा’ या विषयावर जागतिक व्यापार केंद्र मुंबई तर्फे आयोजित पाचव्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे (वर्ल्ड ट्रेड एक्स्पो) उदघाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १७) संपन्न झाले.
शाश्वत वृद्धी व विकासाकडे वाटचाल करत असताना, हरित आणि अक्षय ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करताना हरित ऊर्जा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या धोरणाचा महत्त्वाचा घटक आहे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
देशातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट्र राज्य सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि बायोएनर्जी यांसारख्या क्षेत्रांमध्ये देखील आघाडीवर आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यापासून आपण राज्यातील दोनतृतीयांश जिल्ह्यांना भेट दिली व त्या त्या जिल्ह्यांची बलस्थाने व समस्या समजून घेतल्या असे सांगून राज्याची आर्थिक वृद्धी आणि विकासाची क्षमता थक्क करणारी आहे असे राज्यपालांनी सांगितले. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात देखील आज मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होत आहे ही समाधानाची बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्रात हरित ऊर्जा क्षेत्रासाठी सध्याचे वर्ष ऐतिहासिक आहे. राज्याची सौर ऊर्जा क्षमता ५०८० मेगावॅट असून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणांनुसार, २०२५ पर्यंत ती १२९३० मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे ध्येय असल्याचे राज्यपालांनी सांगितले. गेल्या वर्षी, महाराष्ट्र हे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले असून वर्षाकाठी ५०० किलोटन ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असे राज्यपालांनी सांगितले
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे असे नमूद करून २०२५ पर्यंत सर्व वाहन नोंदणीपैकी १०% वाहने इलेक्ट्रिक असतील तसेच स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी सारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत सहकार्य सुरू आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
नवोन्मेष, शाश्वतता आणि स्वच्छ ऊर्जेला चालना देणारी पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असून विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण उद्योगांना राज्यातील विद्यापीठांसोबत संशोधन, विकास आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात काम करण्याचे आवाहन करीत आहो असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण विभागाचे माजी सचिव तसेच द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) चे मानद फेलो अजय शंकर, जागतिक व्यापार केंद्र मुंबई तसेच ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री, उपाध्यक्ष कॅप्टन सोमेश बत्रा, कार्यकारी संचालक रूपा नाईक, विविध देशांचे वाणिज्यदूत व व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
सुरुवातीला राज्यपालांनी जागतिक व्यापार प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध स्टाल्सला भेट दिली.