बंद

    24.01.2024: महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा

    प्रकाशित तारीख: January 24, 2024

    महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा

    ‘प्रभू राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतु

    महाराष्ट्र तसेच मुंबईच्या विकासात उत्तर प्रदेशच्या लोकांचे मोठे योगदान

    महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये पौराणिक काळापासून संबंध आहेत. प्रातः स्मरणामध्ये लोक काशी विश्वेश्वरासह त्र्यंबकेश्वराचे स्मरण करतात. अयोध्येत जन्मलेल्या प्रभू रामांनी पंचवटी येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे प्रभू राम हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यांना जोडणारा आद्य सेतू आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. उभय राज्यातील लोकांनी परस्परांच्या राज्यांना भेटी दिल्यास त्यातून राष्ट्रीय एकात्मता दृढ होईल असे राज्यपालांनी सांगितले.

    राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.२४) महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत यावर्षी प्रथमच महाराष्ट्र राजभवनात ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला.

    महाराष्ट्रातील लोकांकरिता अनेक वर्षे काशी हे अध्ययन केंद्र होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांचे मोठे योगदान होते. उत्तर प्रदेशाने देशाला पंतप्रधान दिले आहेत तसेच कला, संस्कृती, साहित्य, रंगभूमी या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तित्व दिले आहेत. महाराष्ट्र तसेच मुंबईच्या सामाजिक व आर्थिक विकासात उत्तर प्रदेशच्या लोकांचे मोठे योगदान आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. त्यामुळे पंतप्रधानांचे उत्तर प्रदेशच्या विकासावर विशेष लक्ष आहे असे नमूद करून, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकांनी उत्तर प्रदेशला भेट द्यावी तसेच उत्तर प्रदेशातील लोकांनी देखील महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव पाहावे असे आवाहन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले. उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस सुरु करण्यात माजी राज्यपाल राम नाईक यांचे योगदान महत्वाचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    आद्य शंकराचार्यांनी चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन केल्यामुळे लोक धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने देश भ्रमण करु लागले तसेच तेथील भाषा, बोली, संस्कृती व खानपान समजून घेऊ लागले. या माध्यमातून देश सांस्कृतिक एकसूत्रात बांधल्या गेला, असे सांगून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा केवळ सरकारी कार्यक्रम नसून तो देशाला जोडण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे असे राज्यपालांनी सांगितले.

    कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपुर्वा पालकर, कौशल्य, रोजगार, उद्यमशीलता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी तसेच राज्य कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक व कलाकार उपस्थित होते.

    यावेळी राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी कथक नृत्य, कजरी, ब्रज की होली व रामलीला सादर केले. तेजल चौधरी हिने यावेळी कथक नृत्य सादर केले. राज्यपालांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशच्या सामाजिक, सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा लघु माहितीपट दाखविण्यात आला.