19.01.2024: महाराष्ट्रातील सोलापूर येथे सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 8 अमृत प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी
महाराष्ट्रातील सोलापूर येथे सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 8 अमृत प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी
महाराष्ट्रातील पीएमएवाय-शहरी अंतर्गत पूर्ण झालेली 90,000 हून अधिक घरे राष्ट्राला केली समर्पित
सोलापूर येथील रे नगर गृहनिर्माण संस्थेच्या 15,000 घरांचे लोकार्पण
पीएम-स्वनिधीच्या 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांचे वितरण
“श्री राम यांच्या आदर्शांचे पालन करून आणि देशात प्रामाणिकपणाचे राज्य चालवून देशात सुशासन सुनिश्चित करण्यासाठी आमचे सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील”
“हजारो कुटुंबांची स्वप्ने पूर्ण होतात आणि त्यांचे आशीर्वाद माझी सर्वात मोठी संपत्ती बनतात तेव्हा प्रचंड समाधान मिळते”
“22 जानेवारीला राम ज्योती ही गरिबीचा अंधार दूर करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल”
‘श्रमाची प्रतिष्ठा’,’स्वावलंबी कामगार’आणि ‘गरीबांचे कल्याण’ हा सरकारचा मार्ग आहे
“गरिबांना पक्के घर, शौचालय, वीज जोडणी, पाणी मिळायला हवे, अशा सर्व सुविधाही सामाजिक न्यायाची हमी आहेत”
Posted On: 19 JAN 2024 3:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 19 जानेवारी 2024
महाराष्ट्रातील सोलापूर येथे सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 8 अमृत (अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियान) प्रकल्पांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पायाभरणी केली. महाराष्ट्रात पीएमएवाय-शहरी अंतर्गत पूर्ण झालेली 90,000 हून अधिक घरे आणि सोलापूरमधील रेनगर गृहनिर्माण सोसायटीची 15,000 घरे पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केली. याच्या लाभार्थ्यांमध्ये हजारो हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, कचरा वेचणारे, बिडी कामगार, वाहनचालक आणि इतरांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील पीएम-स्वनिधीच्या 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांच्या वितरणाची सुरुवातही त्यांनी केली. अयोध्या धाम येथील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्यानिमित्ताने संपूर्ण देश भक्ती रसात न्हाऊन निघाला आहे. “अनेक दशकांपासून तंबूत प्रभु रामांचे दर्शन घ्यावे लागण्याची वेदना आता दूर होईल”, असे उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. संत आणि साधूंच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत समर्पण आणि वचनबद्धतेसह 11 दिवसांच्या अनुष्ठानाचे नियम आणि व्रत ते पाळत आहेत तसेच सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने प्राण प्रतिष्ठा आयोजित करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील नाशिक येथील पंचवटी येथे त्यांच्या 11 दिवसांच्या विशेष विधींचा शुभारंभ झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भक्तीच्या या मंगल समयी महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक कुटुंबांचे ‘गृहप्रवेश’ होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “22 जानेवारीच्या संध्याकाळी ही 1 लाख कुटुंबे त्यांच्या पक्क्या घरांमध्ये राम ज्योती प्रज्वलित करतील ही अतिशय आनंदाची बाब आहे”, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या विनंतीवरून लोकांनी त्यांचे मोबाईल फ्लॅश चालू करून राम ज्योतीची प्रतिज्ञा केली. पंतप्रधानांनी आज शुभारंभ झालेल्या प्रकल्पांबद्दल या भागातील जनतेचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या गौरवासाठी महाराष्ट्रातील जनतेने केलेल्या मेहनतीचे आणि पुरोगामी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
“रामाने आपल्याला नेहमीच आपल्या शब्दांचे आणि दिलेल्या आश्वासनांचे पालन करायला शिकवले”, असे म्हणत सोलापूरच्या हजारो गरीबांसाठी घेतलेला संकल्प आज प्रत्यक्षात येत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. भावनिक झालेल्या पंतप्रधानांनी सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आज सर्वात मोठ्या वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले आहे आणि अशा घरांमध्ये राहण्याची त्यांच्या बालपणीची इच्छा होती याची त्यांनी आठवण सांगितली. “हजारो कुटुंबांची स्वप्ने साकार होतात आणि त्यांचे आशीर्वाद माझी सर्वात मोठी संपत्ती बनतात, तेव्हा प्रचंड समाधान मिळते”, असे सांगताना पंतप्रधानांचे डोळे भरुन आले होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्वतः येऊन, घरांच्या चाव्या सुपूर्द करेन, असे आश्वासन या प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात जनतेला दिले होते याची आठवण त्यांनी करुन दिली. “आज मोदींनी त्यांची हमी पूर्ण केली आहे”, ते पुढे म्हणाले, की “मोदींची हमी म्हणजे हमीची पूर्तता”. ज्यांना आज हक्काची घरे मिळाली आहेत आणि ज्यांच्या पिढ्यांना घर नसल्याने त्रास आणि संकटाला सामोरे जावे लागले आहे यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. दुःखाची ही साखळी आता तुटेल आणि येणाऱ्या पिढ्यांना त्याच संकटाला सामोरे जावे लागणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “22 जानेवारी रोजी प्रज्वलित होणारी राम ज्योती ही गरिबीचा अंधार दूर करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल”, असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येकाचे आयुष्य आनंदाने समृद्ध असावे अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
आज ज्या कुटुंबांना नवीन घरे मिळत आहेत त्यांच्या समृद्धी आणि आनंदासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली. “, श्रीरामाच्या आदर्शांचे पालन करून देशात सुशासन प्रस्थापित व्हावे आणि देशात सचोटीचे राज्य असावे यासाठी आमचे सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे. रामराज्यानेच सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राला प्रेरणा दिली आहे” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. रामचरित मानस उद्धृत करत मोदी यांनी गरीबांच्या कल्याणावर सरकारचा भर असल्याचा पुनरुच्चार केला.
एके काळी पक्की घरे आणि शौचालये यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे गरीबांना प्रतिष्ठेपासून वंचित रहावे लागले होते याची पंतप्रधान मोदींनी आठवण करून दिली. यामुळेच सध्याच्या सरकारने घरे आणि स्वच्छतागृहांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले आणि मिशन मोडमध्ये 10 कोटी ‘इज्जत घर’ आणि 4 कोटी पक्की घरे पुरवली.
पंतप्रधान म्हणाले की, लोकांची दिशाभूल करण्याऐवजी सरकारचा मार्ग ‘श्रमाचा सन्मान’, ‘स्वावलंबी कामगार’ आणि ‘गरीबांचे कल्याण’ हा आहे. “तुम्ही मोठी स्वप्ने पहा. तुमची स्वप्नपूर्ती हाच माझा संकल्प आहे,” असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. त्यांनी स्थलांतरित मजुरांसाठी परवडणारी शहरी घरे आणि रास्त भाडे असलेल्या गृहनिर्माण संस्थांचा उल्लेख केला. “आम्ही कामाच्या ठिकाणाजवळ निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत” असे ते म्हणाले.
सोलापूर शहर आणि अहमदाबाद ‘श्रमिकांचे’ शहर आहेत याबाबतीत साधर्म्य साधून पंतप्रधानांनी ‘पूर्वाश्रम’च्या वेळी सोलापूर शहराशी असलेला त्यांचा संबंध अधोरेखित केला आणि सांगितले की, परिस्थिती हलाखीची असूनही पद्मशाली कुटुंबांनीच त्यांना अन्न पुरवले. पंतप्रधानांच्या जीवनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे वकील लक्ष्मणराव इनामदार यांनी विणलेली कलाकृती भेट मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली आणि ती आजही त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे ते म्हणाले.
योग्य हेतूचा अभाव आणि मध्यस्थांकडून होणाऱ्या चोरीमुळे पूर्वीच्या दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांचे अपेक्षित परिणाम आले नाहीत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. स्वच्छ हेतू, गरिबांच्या सक्षमीकरणाला अनुकूल धोरणे आणि देशाप्रती बांधिलकी यामुळे ‘सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची हमी मोदींनी दिली आहे ” असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 10 वर्षात महिला, शेतकरी, तरुण आणि गरिबांच्या खात्यात 30 लाख कोटींहून अधिक रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत,” असे ते म्हणाले. जन धन-आधार-मोबाइलच्या जेएएम त्रिसूत्रीचा वापर करून 10 कोटी बनावट लाभार्थी व्यवस्थेतून बाहेर काढण्यात आले.
विविध योजना सुरू करून गरीबांच्या कल्याणाला प्राधान्य देण्याचे सरकारचे प्रयत्न अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या 9 वर्षांत देशातील 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. हा 10 वर्षांची तपस्या आणि गरीबांप्रति खऱ्या समर्पणाचा परिणाम असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की यामुळे गरीबीवर मात करण्यासाठी इतरांना सक्षम बनवते आणि प्रेरणा देते.
गरीबांना संसाधने आणि सुविधा पुरवल्यास गरीबीवर मात करता येईल या विश्वासाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. म्हणूनच विद्यमान सरकारने संसाधने आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. गरीबांसाठी दोन वेळचे जेवण ही मुख्य समस्या होती त्या काळाची आठवण करून देताना पंतप्रधानांनी सरकारने सुरू केलेल्या मोफत अन्नधान्य कार्यक्रमाचा उल्लेख केला जेणेकरून कोणत्याही गरीबाला रिकाम्या पोटी झोपावे लागू नये. ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात सुरू करण्यात आलेली योजना आता आणखी 5 वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. गरिबीतून बाहेर पडलेल्या 25 कोटी लोकांना भविष्यात कधीही पुन्हा दारिद्र्यरेषेखाली जावे लागू नये यासाठी त्यांना आधार देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. “हे 25 कोटी लोक माझा संकल्प पूर्ण करण्याच्या समर्पणासह पुढे जात आहेत आणि मी त्यांच्या पाठीशी उभा आहे” असे ते म्हणाले.
एक देश एक शिधापत्रिकेचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, यामुळे स्थलांतर करणाऱ्यांना अन्नधान्याचा सातत्यपूर्ण पुरवठा उपलब्ध होईल. लोकांना गरीबीच्या खाईत ढकलण्यामागे आणि गरिबीचे चक्र भेदणे अवघड करण्यामागचे प्रमुख कारण वैद्यकीय खर्च आहे हे त्यांनी अधोरेखित केले.यावर उपाय म्हणून, सरकारने आयुष्मान कार्ड योजना आणली ज्या अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार पुरवले जातात , वैद्यकीय खर्चावरील सुमारे 1 लाख कोटी रुपयांची बचत होते . त्याचप्रमाणे जनऔषधी केंद्रावर 80 टक्के सवलतीत औषधे उपलब्ध असल्यामुळे गरीब रुग्णांची सुमारे 30 हजार कोटी रुपयांची बचत होत आहे. जल जीवन मिशन नागरिकांना जलजन्य आजारांपासून वाचवत आहे. सर्वाधिक लाभार्थी मागासवर्गीय आणि आदिवासी समाजातील आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
“गरीबांना पक्के घर, शौचालय, वीज जोडणी , पाणी अशा सर्व सुविधा मिळायला हव्यात आणि ही सामाजिक न्यायाची हमी आहे”, यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.
“गरीबांना आर्थिक सुरक्षा पुरवली पाहिजे. ही देखील मोदींची हमी आहे”, असे सांगताना पंतप्रधानांनी गरीबांसाठी 2 लाख रुपयांचे अपघात आणि आयुर्विमा संरक्षण असलेल्या विमा योजनांचा उल्लेख केला. गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजेच्या वेळी विम्याच्या रूपात 16,000 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
विशेष करून ज्यांच्याकडे कोणतीही बँक हमी नाही त्यांच्यासाठी मोदींची हमी एक वरदान ठरत आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ज्यांच्याकडे बँक खाती नाहीत अशा नागरिकांचा उल्लेख करत त्यांना बँकेचे कर्ज मिळणे अशक्य असल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. पंतप्रधानांनी जन धन योजनेचा उल्लेख केला. या योजनेद्वारे बँक खाती उघडून 50 कोटी गरीबांना बँकिंग प्रणालीशी जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या प्रसंगाचा उल्लेख करत 10,000 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री स्वानिधी योजने अंतर्गत बँक मदत मिळाली आहे असेही त्यांनी सांगितले. रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाले यांना बाजारातून चढत्या व्याज दराने कर्ज घ्यावे लागत होते, त्यांना आता कोणत्याही हमीशिवाय बँक कर्ज दिले जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “आतापर्यंत त्यांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले गेले आहे”, असे त्यांनी सांगितले.
सोलापूर हे कापडासाठी ओळखले जाणारे औद्योगिक शहर आहे, कामगारांचे शहर आहे याची आठवण करून देत या शहरात आता शालेय गणवेश बनवणारे सर्वात मोठे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे क्लस्टर तयार झाले आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. गणवेश शिलाईच्या कामात गुंतलेल्या अशा विश्वकर्मांना लक्षात घेऊन सरकारने त्यांना कर्ज, प्रशिक्षण आणि आधुनिक उपकरणे देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ‘मोदी की गॅरंटी की गाडी’ देशभरात पोहचत असून पात्र लाभार्थ्यांनी आपली नावनोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.
आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधानांनी या मोहिमेत लघु आणि कुटीर उद्योगांची भूमिका अधोरेखित केली. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी उचललेल्या पावलांची यादी करताना पंतप्रधानांनी कोरोना महामारीच्या काळात केलेल्या मदतीचा तसेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेचा उल्लेख केला. ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘मेड इन इंडिया’ सारख्या मोहिमेमुळे, तसेच सुधारित गुणवत्तेमुळे भारतीय उत्पादनांना नवीन संधी मिळत आहेत, हे पंतप्रधानांनी लक्षात आणून दिले.
सध्याच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात, भारताचा जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होईल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “मी नागरिकांना याची हमी दिली आहे आणि त्याची पूर्तताही केली जाईल”, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी देशाच्या आर्थिक विस्तारात सोलापूरसारख्या अनेक शहरांची भूमिका अधोरेखित केली तसेच या शहरांमधील पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याचे श्रेय डबल इंजिन सरकारला दिले. शहरांना चांगले रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने जोडण्याचे काम वेगाने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असो किंवा संत तुकाराम पालखी मार्ग, त्यावरही काम वेगाने सुरू आहे. रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर दरम्यानच्या चौपदरी महामार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. भाषणाचा समारोप करताना, नागरिक सरकारला आशीर्वाद देत राहतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला तसेच ज्यांना आज कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत त्यांचे अभिनंदनही केले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि रेनगर महासंघाचे संस्थापक नरसय्या आडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.