12.10.2023: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात उन्नती साधावी – राज्यपाल रमेश बैस
वृत्त क्र. 3404 12.10.2023
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात उन्नती साधावी
– राज्यपाल रमेश बैस
नाशिक, दि. 12 (विमाका नाशिक) : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल. असे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे आयोजित नाशिक जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बैठकीस राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, उपसचिव रवींद्र धुर्जड, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शहाजी उमाप, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपवनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) देवीदास नांदगावकर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम सडक योजना, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालास शेतकरी उत्पादक कंपन्यांची जोड दिल्यास शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. बेघरांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. ग्रामीण भागात या योजनेचा लाभ देताना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सौर उर्जा योजनेचा लाभही अंतर्भूत करावा. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय सुविधा असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन ऑनलाईन प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांना एक विदेशी भाषेचे शिक्षण घ्यावे, अशा सूचना राज्यपाल श्री. बैस यांनी दिल्या.
यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी जिल्हा परिषद, कृषी विभाग, महानगरपालिका, समाजकल्याण, आदिवासी विकास वनविभाग, नगरपालिका प्रशासन, महसूल / पुरवठा, पाटबंधारे विभाग, रोजगार हमी योजना, विद्युत वितरण कंपनी यांचा आढावा घेतला.
विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले की, जिल्ह्यात ५६ हजार १०८ वनहक्क दावे प्राप्त असून त्यापैकी ३२ हजार ५४२ दावे पात्र ठरविण्यात आले आहे. उर्वरित दाव्यांवर कार्यवाही सुरू आहे. झोपडपट्टी भागात एस.आर.ए. योजना राबविण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पैठणी उद्योगसाठी लागणारे रेशीम जिल्ह्यातच उत्पादीत होण्याच्या दृष्टीने रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे आयुक्त श्री. गमे यांनी सांगितले.
यावेळी पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ या उपक्रमासोबत इतर उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण तसेच अतिदुर्गभ भागातील माता व बालमृत्यू टाळण्यासाठी गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रसूतीपूर्वीच रुग्णालयांत दाखल करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिली. ‘मनरेगा’अंतर्गत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमात मिशन भगीरथ प्रयास व मॉडेल स्कूल प्रकल्पांची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी दिली. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती गुंडे यांनी शासकीय, अनुदानित व एकलव्य आश्रमशाळांची माहिती यासोबतच आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली.
बैठकीपूर्वी राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव भटू प्रसाद पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अनिल कुलकर्णी, जयदीप निकम आदी उपस्थित होते.
०००००००