03.10.2023 : राज्यपालांकडून रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेच्या कार्याचा आढावा
राज्यपालांकडून रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेच्या कार्याचा आढावा
जिल्हा भेटीच्या वेळी रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार: राज्यपाल रमेश बैस
राज्यपाल रमेश बैस यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (दि. ३) राजभवन मुंबई येथे बैठक घेऊन संस्थेच्या समस्यांचा विस्तृत आढावा घेतला. राज्यपाल हे इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊ, त्यावेळी आपण रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांची त्या त्या जिल्ह्यात आवर्जून बैठक घेऊ, असे राज्यपालांनी बैठकीत सांगितले.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेडक्रॉसच्या कार्याला जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, याची दखल घेऊन राज्यपालांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविण्याचा सूचना दिल्या.
यावेळी रेडक्रॉस महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली.
रेडक्रॉसचे विक्रोळी येथील कोठार असलेल्या जागी आपत्ती निवारण केंद्र विकसित करणे, महाराष्ट्र शाखेच्या वतीने करण्यात येणारे रक्त संकलन, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात सहकार्य करणे, प्रथमोपचार प्रशिक्षण, पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटल व वाई येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचलन, नर्सिंग कॉलेजचे संचलन इत्यादी कार्याची माहिती रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होमी खुसरोखान यांनी यावेळी दिली.
बैठकीला महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष सुरेश देवरा तसेच भंडारा, वर्धा, जळगाव, संभाजीनगर, सांगली, पुणे व कोल्हापूर रेडक्रॉस शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.