बंद

    20.07.2023: डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारोह संपन्न

    प्रकाशित तारीख: July 20, 2023

    डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारोह संपन्न
    डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाने देशासाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक निर्माण करावे: राज्यपाल रमेश बैस
    शिक्षणाचे जागतिकीकरण स्वागतार्ह, परंतु भारतीयता जपावी : डॉ विनय सहस्रबुद्धे

    आकाराने लहान असलेले परंतु शतकी परंपरा लाभलेली विज्ञान संस्था, एल्फिन्स्टन व सिडनहॅम यांसारखी महाविद्यालये लाभलेल्या डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाने शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात अधिक काम करुन जगासाठी उत्कृष्ट शिक्षक निर्माण करावे तसेच देशातील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केले.

    राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. २०) डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे दीक्षांत समारोहाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

    गेल्या काही वर्षात रोजगार क्षेत्रात प्रचंड बदल झाले आहेत. आज नोकरीतील प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचे वर्षाला आणि महिन्यालाच नव्हे तर प्रकरण निहाय मूल्यांकन केले जाते. मात्र, आज उद्यमशीलतेला प्रोत्साहन व चालना दिली जाते असे सांगून युवकांनी उद्यमशील व्हावे व आपापल्या क्षेत्रात नेतृत्व करावे असे राज्यपालांनी सांगितले.

    आज जगभरातील लोक आपल्या कुशल मानवी संसाधनांच्या पूर्ततेसाठी भारताकडे पाहत आहेत असे सांगून स्नातकांनी केवळ मुंबई किंवा महाराष्ट्र येथे नोकरी – व्यवसाय करण्याचा विचार न करता संपूर्ण भारत व त्याही पलीकडे संपूर्ण जग हे आपले कार्यक्षेत्र मानून काम करण्यास सज्ज व्हावे, असे राज्यपालांनी आपल्या दीक्षांत भाषणात सांगितले.

    जगभरातील विद्यापीठे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ऑक्सफर्ड, केंब्रिज, हार्वर्ड सारखी नामांकित विद्यापीठे काळानुरूप बदलत असून विद्यार्थ्यांसाठी नवनवे अभ्यासक्रम राबवत आहेत. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण व कार्यानुभव देताना त्यांच्यात संशोधक वृत्ती, नाविन्यता व सूक्ष्म विचार करण्याच्या क्षमता विकसित करीत आहेत. डॉ. होमी भाभा विद्यापीठाने या गोष्टींचे अनुकरण करावे तसेच यशस्वी उद्योजक, कलाकार, वैज्ञानिक व आपल्या माजी स्नातकांना देखील विद्यापीठाशी जोडावे असे राज्यपालांनी सांगितले.

    शिक्षणाचे जागतिकीकरण स्वागतार्ह, परंतु भारतीयता जपावी : डॉ विनय सहस्रबुद्धे

    भारतीय विद्यापीठे देशाबाहेर जात आहेत आणि बाहेरची विद्यापीठे भारतात येत आहेत. उच्च शिक्षणातील या जागतिकीकरणाचे स्वागत झाले पाहिजे कारण त्यामुळे ज्ञानाचे आदानप्रदान वाढून शिक्षण क्षेत्रातील एकाधिकारशाही संपुष्टात येईल असे प्रतिपादन डॉ विनय सहस्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात केले.
    आजचे जग हे सर्वांना समान संधी देणारे प्रतलीय व्यासपीठ झाले आहे, हे खरे असले तरीही भारतीय लोकांनी आपली भाषिक व सांस्कृतिक विविधता कायम राखून भारतीयता जपली पाहिजे असे त्यांनी सांगितले. आधुनिकता म्हणजे पाश्चात्यांचे अंधानुकरण नाही असे सांगून युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नव्या गोष्टींचा स्वीकार करून विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.

    सुरुवातीला विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत यांनी विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन केले. राज्यपालांच्या हस्ते गुणवत्ताप्राप्त स्नातकांना पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

    दीक्षांत समारंभात विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, आंतरशाखीय अभ्यासक्रम व मानव्यविद्या शाखांमधील एकुण १५४५ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्रदान करण्यात आल्या.

    मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, डॉ होमी भाभा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका विजया येवले, कुलसचिव युवराज मलघे तसेच विविध विभागाचे प्रमुख, आजी – माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. डॉ नितीन आरेकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ युवराज मलघे यांनी आभारप्रदर्शन केले.