बंद

    15.05.2022: राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार

    प्रकाशित तारीख: May 15, 2022

    राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार
    वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते देखील सन्मानित
    केवळ आर्थिक राजधानी नाही; महाराष्ट्र ही संत, वीर योद्धे व समाज सुधारकांची भूमी : राज्यपाल

    महाराष्ट्राचा उल्लेख नेहमी देशाची आर्थिक राजधानी असलेले राज्य असा केला जातो. परंतु महाराष्ट्राची ओळख इतकी मर्यादित नसून महाराष्ट्र ही त्रिकालाबाधित सत्य सांगणाऱ्या संतांची पवित्र भूमी; शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या योद्ध्यांची जन्मभूमी तसेच अनेक समाज सुधारकांची कर्मभूमी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. १५) राजभवन येथे राज्यातील या वर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्तींचा तसेच राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या मुला – मुलींचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते

    वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेतर्फे या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

    विज्ञान, आरोग्यसेवा, कला, क्रीडा, शौर्य या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे तसेच राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आज देश झपाट्याने प्रगती करीत असून कर्तृत्ववान व्यक्तींमुळे राज्याची घोडदौड कायम राहील असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्र ही प्रतिभावंत लोकांची खाण असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे राज्याच्या विकासात योगदान फार मोठे होते. त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते असे नमूद करून राज्याला त्यांच्यासारख्या दृष्ट्या लोकांची अधिक आवश्यकता आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ हिम्मतराव बावस्कर, डॉ विजयकुमार डोंगरे, डॉ अनिल राजवंशी व डॉ भीमसेन सिंघल यांचा तसेच राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते कु. शिवांगी काळे, जुई केसकर व स्वयम विलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

    ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण अनुपस्थित असल्यामुळे त्यांचा सत्कार त्यांच्या नातवाने स्वीकारला. तर डॉ बालाजी तांबे (मरणोपरांत) यांचा पुरस्कार श्रीमती वीणा तांबे यांनी स्वीकारला.

    यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अविनाश नाईक, आमदार इंद्रनील नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले व दीपक पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.