21.12.2021 : राज्यपालांच्या हस्ते सैन्य दलातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना धनादेश प्रदान
राज्यपालांच्या हस्ते सैन्य दलातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना धनादेश प्रदान
विविध क्षेत्रातील समाज सेवकांना शहीद – ए- आझम प्रेरणा पुरस्कार प्रदान
देशासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांना तसेच कारगिल युद्धात अपंगत्व आलेल्या वीर सैनिकांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २१) राजभवन येथे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
जन्नत फिल्म्स संस्थेचे प्रमुख रईस खान यांच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींना शहीद – ए – आझम प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले. इंग्लंड येथील समाज सेविका डॉ परिन सोमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
हुतात्म्यांच्या योगदानाची तुलना कशानेही करता येत नाही. त्यांच्या कुटुंबियांना समाजाने कितीही मदत केली तरीही अशी मदत त्यांच्या बलिदानाच्या तुलनेत काहीच नसते. आपापल्या क्षेत्रात देशासाठी केलेले निःस्वार्थ काम ही देखील देशसेवाच असते असे सांगून गरीब, उपेक्षित व दिव्यांग व्यक्तींसाठी केलेले कार्य हे देशील देशप्रेमच असते असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी हुतात्मा दुर्लभ सिंह, हुतात्मा यश दिगंबर देशमुख, हुतात्मा विजय बापू सोनावणे व हुतात्मा परमवीर अब्दुल हमीद यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला, तसेच सीमेवर लढताना अपंगत्व आलेले दिव्यांग सैनिक कमांडो सुनील जोधा, कमांडो मनिष पीव्ही व नायक दीपचंद यांचा सन्मान करण्यात आला.
राज्यपालांच्या हस्ते पार्श्वगायक उदित नारायण, गायिका डॉ जसपिंदर नरूला, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेते अश्मित पटेल यांसह ४० व्यक्तींना शाहिद ए आझम प्रेरणा पुरस्कार देण्यात आले.