बंद

05.08.2021: मातृभूमी व मातृभाषेविषयीचा अभिमान जागा करा – राज्यपाल

प्रकाशित तारीख: August 5, 2021

मातृभूमी व मातृभाषेविषयीचा अभिमान जागा करा

– राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन

आज शिक्षणामध्ये नवे तंत्रज्ञान वाढत आहे. पण तंत्रज्ञान कितीही वाढले तरी शिक्षण अधिक चांगले करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. देशात मातृभाषेतून इंजीनियरिंग सुरू होणे ही आश्वासक बाब आहे. मातृभाषेतून शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेविषयीचा अभिमान जागा होईल. विद्यार्थ्यामध्ये समर्पणाची भावना निर्माण करण्यासाठी मातृभूमी व मातृभाषेविषयीचा अभिमान जागा करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते.

राम-कृष्ण यांच्याप्रमाणेच श्री. गुरु गोविंदसिंग हे मला सदैव प्रात:अस्मरणीय आहेत. त्यांचे निर्वाण ह्या भूमीत झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या संतांची भूमी आहे. त्यामुळे हे स्थान प्रेरणादायी असे सांगून नवे शैक्षणिक धोरण हे नव्या भारताच्या निर्माणासाठी आहे. या धोरणाचा प्राध्यापक व संशोधकांनी अभ्यास करून त्या दिशेने वाटचाल करावी. येणाऱ्या काळात स्टार्टअप स्वंयरोजगार याविषयी विद्यार्थ्यांना अधिक जागरूक करावे, असेही ते म्हणाले.

यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील विविध शैक्षणिक उपक्रमांची विस्तृतपणे माहिती दिली. तसेच यावेळी जैवविविधता व जलपुनर्भरण यासंदर्भात विद्यापीठांनी केलेल्या कार्याची ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित प्राध्यापकांशी थेट संवाद साधला. विद्यापीठातील विविध संकुलातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाविषयी व प्राध्यापकांच्या अडचणी याबाबत माहिती जाणून घेतली. चर्चेत डॉ. राजाराम माने, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. घनश्याम यळणे, डॉ. गजानन झोरे, डॉ. सिंकू कुमार सिंह, व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्वर हासबे आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या आरंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले तर प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सिनेट सभागृहातील कार्यक्रमानंतर राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठ परिसरात निर्माणाधीन असणाऱ्या श्री. गुरुगोविंदसिंग अध्यासन संकुल आणि संशोधन केंद्राच्या इमारतीच्या कामाचा आढावा घेतला.यावेळी राज्यपालांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जलसिंचन व जल पुनर्भरण करण्यासाठी बनवलेल्या तलावांना राज्यपालांनी प्रत्यक्ष भेट देऊन कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा बहुमोल उपक्रमांचा विद्यापीठाजवळील गावातील जनतेला लाभ व्हावा, अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली. माध्यमाशी बोलतांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिशः लक्ष देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. याप्रसंगी आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, शिक्षण सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, डॉ. रवी सरोदे, डॉ.एल.एम. वाघमारे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. वैजयंता पाटील, डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. महेश मगर, डॉ. अशोक टिपरसे, डॉ. गजानन आसोलेकर, परमेश्वर हासबे, डॉ. दिपक शिंदे यांच्यासह विद्यापीठातील विविध संकुलाचे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.