बंद

    28.01.2021 : ‘पर्यावरण सुसंगत जीवन जगणारे आदिवासी खऱ्या अर्थाने अनादिवासी’: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: January 28, 2021

    ‘पर्यावरण सुसंगत जीवन जगणारे आदिवासी खऱ्या अर्थाने अनादिवासी’: राज्यपाल

    आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    अनादी काळापासून पर्यावरण आणि निसर्ग सुसंगत जीवन जगणारे व आधुनिक जगातील कुप्रथा तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर राहणारे आदिवासी खऱ्या अर्थाने अनादिवासी आहेत. समाजाला आदिवासींपासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आदिवासी संस्कृती समृद्ध असून आदिवासी संस्कृतीचे रक्षण केल्यास तसेच त्यांचेकडून चांगल्या गोष्टी घेतल्यास देशाला त्याचा मोठा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

    गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा ८ वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत गुरुवारी (दि. २८) संपन्न झाला, त्यावेळी राजभवन, मुंबई येथून सहभागी होताना राज्यपाल बोलत होते. राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेचे (नॅक ) अध्यक्ष डॉ. एस सी शर्मा, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकर मंडळांचे सदस्य, विभाग प्रमुख, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

    स्नातकांचे अभिनंदन करताना राज्यपाल म्हणाले, आदिवासी बहुविध प्रतिभेचे धनी आहेत. दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर येथील आदिवासी मुलींनी एव्हरेस्ट शिखर सर केले होते. आदिवासींची कला व हस्तकला देखील समृद्ध आहे. त्यांचे जतन व परिरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे.

    आदिवासी क्षेत्रातील बांबूपासून तयार केलेल्या उत्पादनांचा प्रचार प्रसार केल्यास आदिवासी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होतील. युवकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही. त्यामुळे आत्मनिर्भरतेची सुरुवात गोंडवाना विद्यापीठापासून आणि विशेषतः आदिवासींपासून करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली. गोंडवाना विद्यापीठाने शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात साकार करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करावे, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    विद्यापीठातील स्नातकांनी तसेच विद्यार्थ्यांनी केवळ पदवी प्राप्त करून समाधान न मानता चारित्र्य संपन्न नागरिक व्हावे. पर्यावरण रक्षणासह विद्यार्थ्यांनी समाजसेवा व देशसेवा करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. विद्यापीठातील अध्यापकांचे अध्ययन, चिंतन आणि मनन चांगले असेल तर विद्यार्थ्यांचे अध्ययन देखील चांगले होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

    गोंड समाज हा मध्य भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह असून त्यांचे पारंपारिक ज्ञान व कौशल्य जतन केले पाहिजे असे राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेचे (नॅक ) अध्यक्ष एस सी शर्मा यांनी सांगितले.

    कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. पदवीदान समारोहात विद्यार्थ्यांना आचार्य पदवी तसेच प्राविण्यप्राप्त विद्यार्थांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.