14.12.2020 : कोरोना योद्ध्यांच्या लढ्यामुळे संकटावर मात – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
कोरोना योद्ध्यांच्या लढ्यामुळे संकटावर मात – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
महिमाच्या 19 कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि. 14 : कोरोना महामारीत मागील आठ-नऊ महिन्यांपासून सातत्याने समर्पित भाव ठेवत कोरोना योद्ध्यांनी यशस्वी काम केले. त्यामुळेच आज कोरोना महामारीचे संकट आटोक्यात असून रुग्ण संख्याही कमी झाली आहे. हे सर्वांच्या एकत्रितपणे काम केल्याचे फलित आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
कोरोना काळात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैद्यकीय आणि आरोग्य माहिती व्यवस्थापन संस्थेच्या (MaHIMA) वतीने राजभवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, सर्वांच्या दृढनिश्चय आणि प्रयत्नाने आपण आज कोरोना विषाणूला आटोक्यात आणले आहे. यापुढील काळातही अशाच रितीने कार्य सुरु ठेवून कोरोनावर निश्चितच मात करण्यात यश मिळवू, असा मला विश्वास आहे. अनेक कोरोना योद्ध्यांचा सत्कार, सन्मान करण्याचे सौभाग्य लाभले याचा मला अभिमान आहे. कोरोना योद्धे म्हणजे देवदूत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासह मदतीस असलेले इतर कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस प्रशासन आणि पॅरामेडीकल स्टाफ यांचेही कोरोना आटोक्यात आणण्यात मोठे योगदान आहे. यांच्याशिवाय हे कार्य अशक्यप्राय होते. त्यामुळे या सर्वांचे कार्य वंदनीय आणि पूज्यनीय आहे. सेवाभाव सर्वांनीच जोपासला पाहिजे. मानव सेवा करणे ही ईश्वरसेवा मानून पीडित आणि गरजूंना सेवा-सुविधा देण्याचा संकल्प सर्वांनी केला पाहिजे. हे सेवा संकल्प मिशन यापुढेही सुरु ठेवावे, अशी अपेक्षा राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केली.
यावेळी वैद्यकीय आणि आरोग्य माहिती व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष गिरीराज लाड, लिलावती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पी.व्ही.बट्टलवार उपस्थित होते. सुत्रसंचालन हेमंत निकम आणि प्रस्ताविक डॉ.आशिष अर्बट यांनी केले.