बंद

    31.07.2021 : स्व. जगदेव राम उरांव व रामदास गावित यांचे वनवासी समाज उत्थानाचे कार्य प्रेरणादायी

    प्रकाशित तारीख: July 31, 2021

    स्व. जगदेव राम उरांव व रामदास गावित यांचे वनवासी समाज उत्थानाचे कार्य प्रेरणादायी

    करोना काळात निधन झालेले अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे व्दितीय अध्यक्ष जगदेव राम उरांव तसेच नाशिक जिल्हयातील पूर्णवेळ कार्यकर्ते दिवंगत रामदास गावित यांचे वनवासी- जनजाती समाज उत्थानाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे उदगार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

    जगदेव राम उरांव यांच्या स्मृतीदिनानिमित्त हमारे जगदेव राम या सचित्र पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे शनिवारी (दि. ३१) प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    राज्यपालांच्या हस्ते वनवासी कल्याण आश्रमातर्फे देण्यात येणारा पहिला श्री जगदेव राम उरांव स्मृती पुरस्कार २०२१ स्व. रामदास गावित यांना मरणोपरांत देण्यात आला. स्व. रामदास गावित यांच्या पत्नी यशोदा व पुत्र डॉ हर्षवर्धन यांनी राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारला.

    वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक बाळासाहेब देशपांडे यांनी जगदेवराम उरांव, रामदास गावित यांसारखे अनेक कार्यकर्ते उभे केले असे नमूद करुन वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य व्यापक होत आहे, असे राज्यपालांनी सांगितले. दिवंगत जगदेव राम यांचे अपूर्ण कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    उत्तराखंडच्या पहाडी भागात सुविधांचा अभाव आपण पहिला आहे. मात्र, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात देखील आदिवासी भागातील लोकांना दूरसंचार, मोबाईल सेवा याबाबत अडचणींचा सामना करावा लागतो हे पाहिल्याचे नमूद करुन समाजातील श्रीमंत-गरीब तफावत कमी करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य महत्वाचे असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

    कार्यक्रमाला अख‍िल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराडी, महाराष्ट्र उपाध्यक्ष सोनु म्हसे व मुंबई महानगर अध्यक्ष मुकुंदराव चितळे, प्रांत कार्यवाहक विठठलराव कांबळे आदी उपस्थित होते. महेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर परशुराम गावित यांनी आभार प्रदर्शन केले.