बंद

  31.07.2021: राज्यपालांच्या हस्ते नवभारत आरोग्यसेवा सन्मान प्रदान

  प्रकाशित तारीख: July 31, 2021

  राज्यपालांच्या हस्ते नवभारत आरोग्यसेवा सन्मान प्रदान
  करोना काळात सर्वांनी केलेल्या सेवाकार्याची दखल सुवर्णाक्षरांनी घेतली जाईल : राज्यपाल

  सन १९६२, १९६५ व १९७१ साली देशावर परकीय आक्रमण झाले असताना संपूर्ण देश ज्याप्रमाणे एकत्र झाला, तीच एकी देशात करोनाच्या संक्रमण काळात पहायला मिळाली. केंद्र शासन व राज्य शासन करोनाशी लढण्यासाठी एकत्र काम करीत असतानाच प्रशासन, पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक व सामाजिक संस्थांनी ज्या पद्धतीने मिशनरींप्रमाणे सेवाभावाने काम केले, त्याची दखल इतिहासात सुवर्णाक्षरांनी घेतली जाईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित चौथे आरोग्यसेवा सन्मान राज्यपालांच्या हस्ते तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. ३१) राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

  करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यामुळे डॉक्टर्स, रुग्णालये तसेच गणमान्य नागरिकांनी करोना विषयक जबाबदार वर्तनाचे उदाहरण पुढे ठेवून स्वस्थ महाराष्ट्र निर्मितीमध्ये योगदान द्यावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

  राज्यातील एकूण ६२ लाख करोना बाधितांपैकी ६१ लाख रुग्ण बरे केल्यामुळे राज्यातील डॉक्टर्स खऱ्या अर्थाने जीवनदाते आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. शासनाने सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स आरक्षित करणे, करोना चाचण्यांचे दर ठरवून कमी करणे, मास्कच्या किमतींवर नियंत्रण ठेवणे आदी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणाच्या बाबतीत ग्रामीण भागात अजूनही गैरसमज असून त्याबाबत जनजागृतीची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.

  राज्यपालांच्या हस्ते नेत्रविकार तज्ञ डॉ तात्याराव लहाने, कर्करोग तज्ञ डॉ शैलेश श्रीखंडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, नगरसेवक अभिजित भोसले यांना आरोग्य सेवा सन्मान प्रदान करण्यात आले.

  यावेळी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, डॉ एल एच हिरानंदानी हॉस्पिटल यांसह राज्याच्या विविध भागांमधील हॉस्पिटल्स, विशेषज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांना देखील सन्मानित करण्यात आले.

  कार्यक्रमाला नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रमुख महाव्यवस्थापक अजय कुमार सिंह, संकल्प समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ पांडुरंग कदम व्यासपीठावर उपस्थित होते.