बंद

  31.05.2022: आईसलँडच्या राजदूतांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

  प्रकाशित तारीख: June 1, 2022

  आईसलँडच्या राजदूतांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

  आईसलँडचे भारतातील राजदूत गुडनी ब्रॅगसन यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी (दि. ३१ मे ) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

  भारत आणि आईसलँड भूऔष्णिक ऊर्जा निर्मिती या विषयावर सहकार्य करीत असून या संदर्भात टास्क फोर्स देखील नेमण्यात आला असल्याचे राजदूत गुडनी ब्रॅगसन यांनी सांगितले. भारतातील विविध वैज्ञानिक संस्थांना देखील आपण भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ ऊर्जा क्षेत्राशिवाय आईसलँड भारताशी सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

  आईसलँड येथे भारतीय योग लोकप्रिय असून आपल्या देशाला योग प्रशिक्षकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आईसलँड येथील विद्यापीठात हिंदी विषयाचे अध्यापन सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

  महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती या नात्याने उच्च शिक्षण क्षेत्रात आईसलँडशी सहकार्य करण्यास महाराष्ट्राला निश्चितच आवडेल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. आईसलँड येथील विद्यापीठांमधील अध्यापकांनी राज्यातील विद्यापीठांना भेट द्यावी, अशीही अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

  बैठकीला आईसलँडचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत गुल कृपलानी हे देखील होते.