बंद

    30.07.2022 : महिला वैमानिकांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल राज्यपालांकडून पायलट्सचे अभिनंदन

    प्रकाशित तारीख: July 30, 2022

    महिला वैमानिकांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल राज्यपालांकडून पायलट्सचे अभिनंदन

    देशात तसेच परदेशात महिला वैमानिकांच्या संख्येत व प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे ही आनंदाची बाब आहे. अधिकाधिक महिलांना विमान वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळाव्या या दृष्टीने महिला पायलट संघटनेच्या वतीने वैमानिक प्रशिक्षण व शिष्यवृत्ती देण्याचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

    विविध व्यावसायिक एअरलाईन्स साठी काम करीत असलेल्या महिला वैमानिकांच्या एका शिष्टमंडळाने शनिवारी (दि. ३०) राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

    ‘नाईंटी नाईन्स इंक’ या महिला वैमानिकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या भारतातील संचालिका कॅप्टन निवेदिता भसीन यांच्या नेतृत्वाखाली महिला वैमानिकांनी ही भेट घेतली.

    भारतात विमान तसेच हेलिकॉप्टर पायलट प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अधिक सुरु व्हाव्यात जेणेकरून पायलट प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर देशात जावे लागणार नाही असे मत महिला वैमानिकांनी व्यक्त केले.

    यंदा भारतीय प्रशासकीय सेवेच्या अंतिम परीक्षेत प्रथम तीन क्रमांक महिला अधिकाऱ्यांनी पटकावले. राज्यातील विविध विद्यापीठांच्या दीक्षांत समारोहात देखील महिला सुवर्ण पदक विजेत्यांची संख्या ८० टक्क्यांहून अधिक असते. या पार्श्वभूमीवर महिला पायलट्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी वैमानिक भाषा ठेंगडी तसेच एअर इंडिया, इंडिगो एअरलाईन्स, स्पाईस जेट व पवन हंस हेलिकॉप्टर यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला वैमानिक उपस्थित होत्या.