30.05.2023: “स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक” : राजदूत डॉ. राल्फ हेकनर
“स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक” : राजदूत डॉ. राल्फ हेकनर
विद्यापीठे व उद्योगांसाठी ‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’ तयार करणार असल्याची स्विस राजदूतांची माहिती
भारतात किमान ३३० स्विस कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकी १५० एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे स्वित्झर्लंड करिता सर्वात महत्वाचे राज्य असून स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करार करुन हे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन स्वित्झर्लंडचे भारतातील राजदूत डॉ राल्फ हेकनर यांनी केले आहे.
डॉ राल्फ हेकनर यांनी मंगळवारी (दि. ३०) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
विद्यापीठे व उद्योगांसाठी ‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’ तयार करणार असल्याची स्विस राजदूतांची माहिती
पुणे येथे नुकतीच आपण सार्वजनिक व खासगी विद्यापीठांच्या प्रमुखांशी भेट घेतली. विद्यापीठांमध्ये होत असलेल्या संशोधनाचा व्यापाराला लाभ व्हावा याकरिता स्वित्झर्लंडच्या पुढाकाराने उद्योग व विद्यापीठांकरिता एक सामायिक ‘नाविन्यता व्यासपीठ’ (‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’) सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे राजदूतांनी सांगितले.
या व्यासपीठावर आयआयटी सारख्या संस्थांना देखील घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो २२ देशांमध्ये राबविला जाईल असे त्यांनी सांगितले.
स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे व्यापार, आरोग्य विषयक संयुक्त राष्ट्र संघाची कार्यालये आहेत. तसेच दावोस येथे दरवर्षी जागतिक आर्थिक परिषद होते. या दोन्ही ठिकाणी भारताचा सहभाग लक्षणीय आहे. त्यामुळे भारताच्या मताची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते, असे त्यांनी सांगितले.
सन २०४७ साली भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तोवर भारताला विकसित राष्ट्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे नमूद करून या उद्दिष्ट प्राप्तीसाठी भारत – स्वित्झर्लंड मुक्त व्यापार करार होणे आवश्यक असल्याचे हेकनर यांनी सांगितले.
स्वित्झर्लंड – भारत मुक्त व्यापार करार झाल्यास कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होतील याची माहिती धोरणकर्त्यांना तसेच उद्योगजगताला देण्यासाठीच आपण मुंबई भेटीवर आलो असल्याचे डॉ हेकनेर यांनी सांगितले.
कोरोना संसर्गानंतर भारताने स्विस दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड मात्रा उपलब्ध करून दिल्याबद्दल हेकनर यांनी भारताचे आभार मानले. स्वित्झर्लंडला भारताकडून अधिक गुंतवणूक तसेच नाविन्यता व संशोधन सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यश चोप्रा यांनी स्वित्झर्लंड येथे आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण केल्यामुळे दरवर्षी अडीच ते तीन लाख भारतीय पर्यटक स्वित्झर्लंडला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वित्झर्लंड भारताचा ११ वा मोठा गुंतवणूकदार देश असून मुंबईतील वाणिज्य दूतावास १०८ वर्षांपासून कार्यरत असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. स्वित्झर्लंड सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान व औषधीनिर्माण या क्षेत्रातील कौशल्य प्रधान देश असून उभय देशांत कौशल्य आदान – प्रदान करार झाल्यास भारतातील युवकांच्या कौशल्याचा अनेक देशांना फायदा होईल असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यापीठांचा कुलपती या नात्याने उभय देशांमधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी – तसेच अध्यापक – आदानप्रदान वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. बैठकीला स्वित्झर्लंडचे मुंबईतील वाणिज्यदूत मार्टिन माईर हे देखील उपस्थित होते.
**