30.03.2023 : श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करणार: मिलिंदा मोरागोडा
आपल्या देशात भारतीय पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करीत असून भारतीय रुपयांमध्ये आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्याबाबत देखील विचार करीत असल्याची माहिती श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज येथे दिली.
उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी गुरुवारी (दि. ३०) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
भारतातून श्रीलंकेत गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने आपण परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांचेशी विचारविनिमय करीत असल्याची माहिती उच्चायुक्तांनी यावेळी दिली.
श्रीलंकेत रामायणासंबंधी किमान ४० ठिकाणे असून पाच शिवमंदिरे देखील आहेत. त्यापैकी त्रिंकोमाली येथील शिवमंदिर तर रावणाने बांधले असल्याची लोकांची मान्यता असल्याचे राजदूतांनी सांगितले. श्रीलंकेत एक बुद्ध मंदिर देखील असून त्याचे नजीक विभीषणाची पूजा केली जाते असे त्यांनी सांगितले. भगवान बुद्धांनी देखील श्रीलंकेला भेट दिली होती अशी आपल्या देशातील लोकांची धारणा असल्याचे उच्चायुक्तांनी सांगितले. बैठकीला श्रीलंकेचे मुंबईतील वाणिज्यदूत वाल्सन वेतोडी हे देखील उपस्थित होते.