बंद

    29.12.2020 : ‘लेटर टू मदर’ पुस्तकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

    प्रकाशित तारीख: December 29, 2020

    ‘लेटर टू मदर’ पुस्तकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

    मुंबई, दि. 29 : प्रधानमंत्री मोदी यांचे माता जननीसाठी असलेले उत्कट प्रेम आणि आदर असलेल्या विलक्षण भावनांचे इंग्रजीत अनुवाद करून लेखिका भावना सुमाया यांनी त्या भावना अमर केल्या असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखीत साक्षी भाव या गुजराती पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद पद्मश्री भावना सुमाया यांनी ‘लेटर टू मदर’ या पुस्तकरूपाने केला आहे. या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

    या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास वुमन इन लिडरशीप कम्युनिटीच्या संचालक स्वप्ना मोरे, मुख्य उपदेशक श्वेता शालिनी आणि विविध क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

    राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, जवळपास ३४ वर्षापूर्वी एका सामान्य रूपात वावरणा-या व्यक्तीने आपल्या मातेप्रती असलेल्या भावना एका डायरीत लिहून ठेवल्या होत्या. त्या आज इंग्रजी भाषेच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याचे कार्य लेखिका सुमाया यांनी केले आहे. आई ही एक अद्भुत शक्ती आहे. माता, भारत माता आणि जननी माता या प्रती असलेल्या उत्कट भावना आणि आदर यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे. त्यांनी भारत मातेलाच जगत जननी बनविण्याची कल्पना केली आहे, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निसर्गाप्रती असलेले निरीक्षण, अनुभव, बदल, दु:ख, स्नेह, वंचितपणा, माणुसकी, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक भाव, अशा अनेक भावनांचे इंग्रजी भाषेत अनुवाद करून मुळ पुस्तकापेक्षाही सुलभ करण्याचा प्रयत्न भावना सुमाया यांनी केला आहे, असे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

    भावना सुमाया म्हणाल्या, हे पुस्तक काव्यरूपात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तरूणपणी रोज माता जननी यांना पत्र लिहिण्याची सवय होती. १९८६ मध्ये लिहिलेल्या एका डायरीत त्यांची ही पत्रे आढळली. माता जननी प्रती असलेल्या भावना ‘साक्षी भाव’ या पुस्तकरूपाने २०१४ मध्ये गुजराती भाषेत प्रकाशित झाले होते.

    या पुस्तकात सुखद वेदना, क्षणिक आनंद आणि अविस्मरणीय स्मृती, तरूणाईचा उत्साह , परिवर्तनाची आवड, निसर्गाची ओढ असे वैविध्यपुर्ण विषय त्यांच्या लेखनात आढळून आले, ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी केला आहे. लेटर टू मदर या पुस्तकात १९८६ च्या एका सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या असल्याचे भावना सुमाया यांनी सांगितले.

    ००००

    DGIPR