बंद

    29.10.2024: सन २०२६ भारत – स्पेन सांस्कृतिक, पर्यटन वर्ष साजरे करणार

    प्रकाशित तारीख: October 29, 2024
    29.10.2024: राज्यपालांनी स्पेनचे पंतप्रधान पेद्रो संचेझ यांचे शासनाच्या वतीने  राजभवन येथे  स्वागत केले

    सन २०२६ भारत – स्पेन सांस्कृतिक, पर्यटन वर्ष साजरे करणार

    स्पेन फुटबॉल संघ लवकरच भारतात सामने खेळणार: पंतप्रधान पेद्रो संचेझ

    विद्यापीठ, सांस्कृतिक आदानप्रदान व चित्रपट निर्मिती क्षेत्रात स्पेन भारताशी सहकार्य वाढवणार

    सध्या मुंबई भेटीवर आलेले स्पेनचे पंतप्रधान पेद्रो संचेझ यांनी स्पेन भारताशी विद्यापीठ स्तरीय सहकार्य, शैक्षणिक व सांस्कृतिक आदानप्रदान तसेच चित्रपट निर्मित क्षेत्रात सहकार्य वाढविणार असल्याचे सांगितले. स्पेनचा फ़ुटबॉल संघ लवकरच भारतात सामने खेळण्यास येईल, असेही त्यांनी सांगितले.

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्य शासनाच्या वतीने स्पेनचे पंतप्रधान पेद्रो संचेझ व त्यांच्या पत्नी बेगोनिया गोमेझ यांचे सन्मानार्थ मंगळवारी (दि. २९) राजभवन मुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन केले होते, त्यावेळी संचेझ बोलत होते.

    सन २०२६ हे वर्ष भारत – स्पेन संस्कृती, पर्यटन व कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याचे सांगून फुटबॉल प्रशिक्षणासाठी आपण भारतात प्रशिक्षक पाठवू तसेच क्रिकेटसाठी भारताकडून सहकार्य घेऊ असे त्यांनी सांगितले.

    मुंबईत आपण चित्रपट निर्मात्यांची भेट घेतल्याचे सांगून स्पेन भारतीय चित्रपट उद्योगासोबत सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

    स्पॅनिश ही जगातील दुसरी मोठी भाषा असून भारत व स्पेनने भाषा सहकार्य वाढविले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपणास स्वतःला हिंदी भाषा शिकण्यास आवडेल असेही संचेझ यांनी सांगितले. आपण रवींद्रनाथ टागोर यांचा स्पॅनिश भाषेत भाषांतरित गीतांजली संग्रह वाचला असल्याचे संचेझ यांनी राज्यपालांना सांगितले.

    भारतात फुटबॉल दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून येथील युवक युरोपिअन कप फुटबॉल देखील जागून पाहत असल्याचे राज्यपालांनी संचेझ यांना सांगितले. स्पेन संघाचे भारतात फुटबॉल सामने झाल्यास भारत – स्पेन संबंध अधिक दृढ होतील असे राज्यपालांनी सांगितले.

    महाराष्ट्र आणि स्पेनमधील विद्यापीठांमधील सांस्कृतिक सहकार्य आणि शैक्षणिक देवाणघेवाण वाढल्यास आपणांस निश्चितच आनंद होईल. महाराष्ट्रात चांगली विद्यापीठे असल्याचे सांगून महाराष्ट्रातील विद्यापीठे स्पॅनिश भाषेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असल्याचे राज्यपालांनी संचेझ यांना सांगितले.

    यावेळी स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे संस्थापक संदीप वासलेकर यांनी स्पेनच्या पंतप्रधानांना आपले ‘अ वर्ल्ड विदाउट वॉर’ हे पुस्तक भेट दिले तसेच सदर पुस्तक लवकरच स्पॅनिश भाषेत येत असल्याचे सांगितले.

    बैठकीनंतर राज्यपालांनी पंतप्रधान पेद्रो संचेझ व त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले.

    यावेळी स्पेनचे उद्योग व पर्यटन मंत्री जॉर्दी अरेऊ, पर्यटन मंत्री ओस्कार पुएंटे, स्पेनचे भारतातील राजदून व्हान अँटोनियो मार्च पूयोल, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोर्हे, नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी ऍडमिरल संजय जे सिंह, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, संदीप वासलेकर आदी उपस्थित होते.