बंद

    29.08.2020 : ‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

    प्रकाशित तारीख: August 29, 2020

    ‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

    जल संवर्धन कार्यासाठी आपले जीवन वेचणारे भारताचे ‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग यांना शनिवारी (दि. २९) राज्यपाल भगतसिंह यांच्या दूरस्थ उपस्थितीत ‘न्या. नागेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

    ‘भारतातील जल संवर्धनाचे कार्य’ या विषयावर आयोजित ३१ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राज्यपालांचे हस्ते राजेंद्र सिंग यांना हा पुरस्कार देण्यात आला. दिवंगत न्या. नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालय ‘द हेग’ येथे मुख्य न्यायमूर्ती होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंटरनेशनल गुडविल सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्कृतिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येतो.

    पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी पासून जल तत्व अस्तित्वात होते असे नमूद करताना आत्म निर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाला पाण्याच्या बाबतीत आत्म निर्भर व्हावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    गेल्या सहा वर्षांमध्ये देशाने आरोग्य, स्वच्छता, संडास बांधणी व स्वच्छ पाणी पुरवठा या निर्देशांकांवर लक्षणीय प्रगती केली आहे. सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाने स्वच्छ पाणी पुरवठा देण्याची योजना आकार घेत असल्याचे नमूद करून जलसंवर्धनाच्या कार्यासाठी केवळ सरकारवर विसंबून न राहता नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी देखील योगदान दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. योगेंद्र नारायण, महासचिव आर के भटनागर, भारतीय जल संसाधन सोसायटीचे अध्यक्ष एस. के. कुमार, भारतीय लोक प्रशासन संस्थेच्ये अध्यक्ष एस.एम. त्रिपाठी यांसह जल व्यवस्थापन – संवर्धन क्षेत्रातील अनेक तज्ञ – निमंत्रित उपस्थित होते.

    **