बंद

    29.08.2020 : ‘आरोग्यदीप’च्या करोना विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    प्रकाशित तारीख: August 29, 2020

    ‘आरोग्यदीप’च्या करोना विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    महाराष्ट्र आरोग्यदीप या आरोग्य विषयक वार्षिकाच्या करोना विशेषांकाचे प्रकाशन आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.

    माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या विशेषांकामध्ये नामवंत डॉक्टर्स व विशेषज्ञांच्या करोना व्यवस्थापनावर लेखांचा समावेश असल्यामुळे आरोग्यदीपचा अंक ज्ञानवर्धक व वाचनीय झाला असल्याचे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

    करोनामुळे लोक अनावश्यक भयभीत झाले असल्याचे नमूद करून डॉक्टरांनी जनसामान्यांचे करोनाविषयक गैरसमज दूर करून त्यांना आत्मविश्वास द्यावा, अशी सूचना राज्यपालांनी उपस्थित डॉक्टरांना केली.

    योग्य खबरदारी व आत्मविश्वास यांच्या मदतीने आपण करोनाला निश्चितपणे पराभूत करू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

    करोनाचे मधुमेह व थायरॉईडवर होणारे परिणाम, होमिओपथीच्या माध्यमातून कोविडशी लढा, अतिदक्षता विभागातील कोविड रुग्णांचे व्यवस्थापन, कोविड आणि नेत्र आरोग्य, कोविडमध्ये आरोग्य दक्षता, मानसिक आरोग्य आणि कोविड, यांसह अनेक लेखांचा विशेषांकात समावेश करण्यात आला आहे.

    डॉ. दीपक पाटकर, डॉ. दीपक नामजोशी, डॉ. पिनाक दंदे, डॉ. स्वप्नेश सावंत, डॉ. परेश नवलकर, डॉ. जॉय चक्रवर्ती, डॉ. राजेश राव, मुद्रक आनंद लिमये आदि यावेळी उपस्थित होते.