29.05.2021: राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संत गाडगे बाबा अमरावती विदयापीठाचा ३७ वा दीक्षांत समारोह संपन्न
राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संत गाडगे बाबा अमरावती विदयापीठाचा ३७ वा दीक्षांत समारोह संपन्न
भावपूर्ण समारोहात समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना मानद डी.लिट प्रदान
अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत शनिवारी (दि. २९) ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला.
यावेळी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
अमरावती जवळील वझ्झर येथे मतिमंद, मूकबधिर व अनाथ मुलांसाठी बालगृह आश्रम चालवून १२३ दिव्यांग व्यक्तींचे संगोपन करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना त्यांच्या कार्याबद्दल विद्यापीठातर्फे मानव विज्ञान पंडित (डी. लिट.) ही मानद उपाधी प्रदान करण्यात आली. अतिशय भावपूर्ण झालेल्या वातावरणात ८० वर्षीय शंकरबाबांनी ही पदवी कुलगुरूंच्या हस्ते एका दिव्यांग मुलासह स्वीकारली.
प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर व्हावा : राज्यपाल कोश्यारी
विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम दृढ संकल्प करावा व त्यानंतर कर्म हीच पूजा आहे हे जाणून संकल्प सिद्धीसाठी कठोर परिश्रम करावे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल असे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.
नितीन गडकरी यांचे व्यक्तित्व व कर्तृत्व प्रेरणादायी आहे असे सांगून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने शेकडो नितीन गडकरी निर्माण करावे व देशाचे नाव उंचवावे असे राज्यपालांनी सांगितले. आजच्या पदवीदान समारोहात सुवर्ण पदक विजेत्यांमध्ये ९० टक्के विद्यार्थिनी होत्या याचा उल्लेख करून राज्यपालांनी मुलींच्या नेत्रदीपक यशाबाबत आपला आनंद व्यक्त केला.
विद्यापीठाने अमरावती जिल्ह्याच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करावी : नितीन गडकरी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अमरावती जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिवर्तनाची जबाबदारी स्वीकारावी तसेच जिल्ह्याची बलस्थाने व कमजोरी ओळखून विकासाची ब्लु प्रिंट तयार करावी अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दीक्षांत भाषणात केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यात देखील विद्यापीठाची भूमिका महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्ट कार्ड असावे: उदय सामंत
शंकरबाबा पापळकर यांना डी लिट दिल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शंकरबाबा हे ‘अनाथांचे बाप’ असून आजच्या काळातील संत गाडगे बाबा असल्याचे सांगितले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने करोना काळात चांगले काम केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून प्रत्येक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट कार्ड असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या दीक्षांत समारंभात ११० सुवर्णपदके, २२ रौप्यपदके व २२ रोख पारितोषिके तसेच ३१६ आचार्य (पीएच.डी.) पदव्या प्रदान करण्यात आल्या.
*****