28.08.2023: ‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दीष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक-राज्यपाल
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दीष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक-राज्यपाल
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कुवल्यानंद योग पुरस्कारांचे वितरण
पुणे दि.२८-माणसाचे जीवनमान उंचावण्यात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता योग साधनेत आहे. व्यापक अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शांतता स्थापित करून ‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दीष्ट गाठण्यातही योग उपयुक्त आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
लोणावळा येथील कैवल्यधाम योगसंस्थेतर्फे आयोजित ‘स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार-२०२३’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला सीबीआयचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन, कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, सहव्यवस्थापक डॉ.आर.एस.भोगल, हृषिकेश येथील स्वामी राम साधक ग्रामचे स्वामी रित्वन भारती, रवी दिक्षीत आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.बैस म्हणाले, योग केवळ निरोगी शरिरासाठीचा व्यायाम नसून ही शरीर, मन आणि आत्म्याशी संलग्न असलेली प्रक्रीया आहे. ती एक निरोगी जीवन जगण्याची शैली असून योगसाधनेचे अंतिम उद्दीष्ट आंतरिक शांती, सद्भावना आणि आत्मसंयमाचा विकास आहे. त्यामुळे विविध प्रकारांच्या आजारांचे प्रमाण वाढत असतांना आणि युवा पिढी व्यसनाकडे वळत असतांना योगविद्येचा प्रसार अधिक महत्वाचा ठरतो.
योगसाधनेद्वारे निर्माण होणारा आत्मसंयम आणि सहनशीलता शांततापूर्ण समाजनिर्मितीत उपयुक्त ठरते. देशातील लाखो युवकांसाठी रोजगाराच्या माध्यमातून समृद्धी आणण्यासाठी योग प्रेरक ठरू शकते.
भारताच्या योगविद्येला आज जगाने स्विकारले आहे. योग दिवस साजरा करण्यासोबत आपण योग सप्ताह साजरा करण्याचाही विचार करावा. प्रत्येक शाळा-महाविद्यालयात या संदर्भातील आयोजन करण्यात येऊन प्रशिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना योगासनाच्या मुलभूत बाबी समजविल्या जाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कैवल्यधाम संस्थेत योगविद्येचे ‘ऑक्सफोर्ड’ होण्याची क्षमता असल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले, या संस्थेने
जगासाठी सर्वश्रेष्ठ योग शिक्षक तयार करून जगातील विविध देशात आपले केंद्र सुरू करावे. संस्थेने योगविद्येच्या प्रसारासाठी या क्षेत्रात संशोधन करणारे समर्पित विद्यापीठ व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यपाल श्री.बैस यांनी संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले.
राज्यपाल महोदयांच्या हस्ते पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन, स्वामी रित्वन भारती यांना कुवल्यानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना पुरस्कारार्थींनी योगाचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमपूर्वी राज्यपालांनी कैवल्यधाम योग संस्था परिसरास भेट दिली आणि तेथील ग्रंथालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.