बंद

    27.11.2024: “विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको”: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

    प्रकाशित तारीख: November 27, 2024
    27.11.2024: राज्यपालांनी 'पर्यावरणासाठी जीवनशैली: शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन' या विषयावरील  चर्चासत्राचे केले उदघाटन

    “विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको”: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

    देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासही आवश्यक आहे आणि पर्यावरण रक्षण देखील. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते. पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

    ‘पर्यावरणासाठी जीवनशैली: शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील एका चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. २७) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मुंबई येथील सभागृहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    चर्चासत्राचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज या संस्थेने ‘कोटक स्कुल ऑफ सस्टेनेबिलिटी’, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, एनआयटी वरंगल, आदी संस्थेच्या सहकार्याने केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र कधी कधी पर्यावरण विषयांवर ताठर भूमिका घेतली जाते. दक्षिण भारतातील एका मार्गावर उभ्या असलेल्या चार झाडांच्या रक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. या महामार्गावर पंधरा वर्षात जवळजवळ तीन हजार लोकांचे बळी गेले होते, असे सांगून चार झाडे कापणे आवश्यक असेल तर त्याऐवजी २५ नवी झाडे लावण्यासारखी सकारात्मक अट घातली गेली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    देशात जलसंवर्धन व नदीजोड प्रकल्पांचे काम झाल्यास देशातील अन्नधान्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढेल व भारत संपूर्ण जगासाठी अन्न निर्मिती करू शकेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    भारतीय संस्कृतीमध्ये नदी, पर्वतराजी व वृक्षवल्लीची पूजा केली जाते. आपण निसर्गाचे व नैसर्गिक संपदेचे मालक नसून विश्वस्त आहोत ही भूमिका भारतीय विचारातून अधोरेखित केली जाते. वसुंधरा आपल्या विविधतेसह पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी बोलताना गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी भारतीय विचारधारेतील पाण्याचा, अन्नधान्याचा व ऊर्जेचा जबाबदारीने विनियोग याबाबतचे चिंतन यावर भाष्य केले तसेच प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक वेस्टच्या आव्हानाबद्दल चिंता व्यक्त केली.

    उदघाटन सत्राला भारतीय नदी परिषदेचे सदस्य, ‘रिव्हर मॅन ऑफ इंडिया’ रमण कांत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.