बंद

    27.03.2023 : राज्यात कौशल्य क्रांती आणण्यासाठी कौशल्य विद्यापीठाची भूमिका महत्वाची : राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: March 27, 2023

    राज्यात कौशल्य क्रांती आणण्यासाठी कौशल्य विद्यापीठाची भूमिका महत्वाची : राज्यपाल रमेश बैस

    साधारण सन १७५० पर्यंत जगाच्या व्यापारामध्ये भारताचे प्रमाण एक चतुर्थांश होते व भारत कौशल्याची राजधानी होते. वस्त्रोद्योग, जहाज निर्माण, धातुशास्त्र, अभियांत्रिकी, स्थापत्यकला यांसह अनेक क्षेत्रांमध्ये भारत अग्रणी राष्ट्र होते. आज पुन्हा एकदा देशाला कौशल्याची राजधानी बनविण्याची गरज असून राज्यात कौशल्य क्रांती आणण्यासाठी नव्याने निर्माण केलेले राज्य कौशल्य विद्यापीठ मैलाचा दगड सिद्ध होईल असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

    महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व आयटीआय पनवेलच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते सोमवारी (दि. २७) पनवेल येथील औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

    यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, पर्यटन व महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा व रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत व्यासपीठावर उपस्थित होते.

    सरासरी वयोमान २९ असलेला भारत आज जगातील सर्वाधिक युवा देश असून जगातील अनेक देशांची लोकसंख्या वयस्कर होत आहे. त्यामुळे अनेक देशांना भारताकडून प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून ही गरज पूर्ण करण्यासाठी देशाला कुशल मनुष्यबळ निर्माण करावे लागेल असे राज्यपालांनी सांगितले.

    आपल्याच शहरात अथवा गावात नोकरी शोधण्याची युवकांमधली मानसिकता बदलावी लागेल व ज्या ठिकाणी उद्योग – नोकरीच्या चांगल्या संधी असतील, त्या ठिकाणी जाण्याची युवकांची तयारी असली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    नुकत्याच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेनंतर राज्यात मोठे उद्योग व गुंतवणूक येणे अपेक्षित असून राज्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या मिळविण्यासाठी युवकांनी योग्य ती कौशल्ये आत्मसात केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

    राज्यातील आदिवासी बांधवांकडे अनेक कला, क्रीडा व उद्योग कौशल्य आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन बांबू फर्निचर, मध आदी वनौपज वस्तूंच्या विपणन, पॅकेजिंग व विक्रीसाठी मदत केल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळेल असे सांगून विद्यापीठाने महिलांसाठी तसेच शासकीय व खासगी क्षेत्रातील कर्मचारी यांचेसाठी देखील कौशल्य वर्धन कार्यक्रम तयार करावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    विद्यापीठाने राज्यातील प्रत्येक शहर व प्रत्येक गावापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या आर्थिक उत्थानासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    चीन जगाची वस्तू उत्पादनाची फॅक्टरी आहे. मात्र आज चीनवरचे अविलंबित्व कमी करून जगातील अनेक देश भारताला उत्पादनाची फॅक्टरी बनविण्यासाठी उत्सुक आहेत असे नमूद करून राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्याला मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल व हे कार्य कौशल्य विद्यापीठाने करावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

    देशातील सेवा क्षेत्र सातत्याने वाढत असून या क्षेत्रात नवनव्या संधी निर्माण होत आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी फिनटेक-सह इतर सेवा क्षेत्रासाठी मनुष्यबळ तयार करावे लागेल असे त्यांनी सांगितले.

    राज्यात १५००० स्टार्टअप्स असून लवकरच नवी मुंबई येथे स्टार्टअप हब तयार करण्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.

    कौशल्य विद्यापीठ व आयटीआय पनवेलची नवी वास्तू येत्या जुलैमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी तयार होईल असे आश्वासन यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी दिले.

    उद्योग आणि कौशल्य विकास विभागाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगून त्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील असे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. कौशल्य विद्यापीठाचे पहिले उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु करावे व त्याठिकाणी पर्यटन विषयक अभ्यासक्रम राबवावे अशी अपेक्षा सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.

    कार्यक्रमाला कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपुर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे मुख्याधिकारी डॉ रामास्वामी एन., कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाध‍िकारी योगेश म्हसे तसेच लोकप्रतिनिधी व निमंत्रित उपस्थित होते.