बंद

    27.02.2025: भाषा टिकली तर संस्कृती टिकेल; मुलांना मराठी बोलण्यास लिहिण्यास प्रेरित करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    प्रकाशित तारीख: February 27, 2025
    27.02.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'माय लेकरं' हा कार्यक्रम संपन्न

    राजभवन येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डॉ गिरीश ओक, मृणाल कुलकर्णी यांचे मनोज्ञ भाववाचन

    राज्यपालांच्या उपस्थितीत ‘माय लेकरं’ कार्यक्रम संपन्न

    मराठी भाषा हा हिरा; त्याचे जतन व्हावे

    भाषा टिकली तर संस्कृती टिकेल; मुलांना मराठी बोलण्यास लिहिण्यास प्रेरित करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    प्रत्येकाने किमान एक मराठी वृत्तपत्र घरी आणावे, राज्यपालांचे आवाहन

    तामिळ भाषेला अभिजात दर्जा मिळावा या साठी फार मोठा संघर्ष करावा लागला होता. मराठीला त्या तुलनेने कमी प्रयत्नाने अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची मराठी हा अस्सल हिरा असून या हिऱ्याचे जतन केले तर संस्कृती टिकेल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले.

    मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २७) राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मराठी अभिवाचन, काव्यवाचन व गायनाचा ‘माय लेकरं’ हा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांनी दोन तासांचा हा कार्यक्रम संपूर्णवेळ उपस्थित राहून पाहिला.

    आपण राज्यपाल पदावर असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे आपले भाग्य आहे असे सांगून आपल्याजवळ हिरा आहे ही ज्याला जाणीव नाही तो त्याचा पेपरवेट म्हणून उपयोग करतो; तसे भाषेच्या बाबतीत होऊ नये असे राज्यपालांनी सांगितले. जीवनात आई मुलाचे नाते विलक्षण असून राजमाता जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते असे राज्यपालांनी सांगितले.

    महाराष्ट्र व तामिळनाडूच्या सांस्कृतिक संबंधाबाबत बोलताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तामिळनाडू अभियानाची आठवण केली. शिवाजी महाराजांनी तामिळनाडूतील जिंजी किल्ला जिंकला होता तसेच वेल्लोरचा देखील त्यांचा संबंध होता असे सांगून शिवाजी महाराजांच्या काळात तंजावर येथे व्यंकोजी राजे व पुढे सरफोजी राजे भोसले यांचे राज्य आले होते असे त्यांनी सांगितले. तंजावर येथे भोसले घराण्याने यांनी केवळ मराठी भाषा व संस्कृतीचे जतन केले असे नाही तर त्यांनी तेथील भव्य अश्या सरस्वती महाल ग्रंथालयात दुर्मिळ तामिळ साहित्याचे देखील जतन केले असे राज्यपालांनी सांगितले.

    काळानुरूप इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक झाले आहे व आज सर्वच प्रदेशातील लोक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहेत. मात्र प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या घरी आग्रहाने मराठी भाषा बोलली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्यात आला असून अनेक विद्यापीठांमध्ये आज पुस्तकांचे मराठी भाषांतर केले जात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    आज भाषिक लिखाणाचा लोकांना सराव राहिला नसून प्रत्येकाने घरी किमान एक मराठी वृत्तपत्र घेऊन वाचले पाहिजे व लिखाणाचा देखील सराव केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. पालकांनी मुलांना दिवसातून किमान एक पान तरी मराठी वाचण्यास प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    पुणे येथील ‘कलागंण’ या संस्थेच्या वतीने ‘माय लेकरं’ हा आई आणि मूल यांच्या नात्याचा गोफ उलगडणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    डॉ अरुणा ढेरे यांची संकल्पना व संहिता असलेल्या या कार्यक्रमात डॉ गिरीश ओक व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या अभिवाचनानें तर कलांगणच्या संस्थापिका गायिका चैत्राली अभ्यंकर यांनी आपल्या सुरेल काव्यवाचनाने राज्यपालांसह उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी यांच्यापासून अनेक नव्या जुन्या लेखक कवींच्या आई व मूल नात्यांसंबंधी उताऱ्यांचे व कवितांचे भाववाचन करण्यात आले.

    कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती तसेच कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित दाते यांनी केले तर चैत्राली अभ्यंकर यांनी आभारप्रदर्शन केले.