बंद

    26.11.2023: ६ व्या मुनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

    प्रकाशित तारीख: November 26, 2023

    ६ व्या मुनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

    राज्यपालांच्या हस्ते गायक आगम निगम व गीतकार समीर अंजान सन्मानित

    ज्येष्ठ भजन गायक अनुप जलोटा निमंत्रक असलेल्या ६ व्या मुनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न अंधेरी येथील मुक्ती सभागृह येथे शनिवारी (२६ नोव्हेंबर) रोजी संपन्न झाला.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ गायक आगम निगम, गीतकार समीर अंजान, पार्श्वगायिका साधना सरगम (अनुपस्थित), दिग्दर्शक सुधीर अत्तावर, अभिनेत्री निवेदिता तसेच उत्कृष्ट चित्रपटासाठी ‘मृत्योर्मा’चे निर्माते यांना सन्मानित करण्यात आले.

    चित्रपट महोत्सव व पुरस्कार सोहळा आयोजित करुन प्रतिभावंत कलाकारांचा सन्मान केल्याबद्दल मुनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल संस्थेचे अभिनंदन करताना भारतीय चित्रपटांच्या सुवर्ण काळातील स्मृतींना उजाळा दिला. भारतीय चित्रपट सृष्टीने एकापेक्षा एक कसदार चित्रपट निर्माण करून चित्रपटांचे सुवर्ण युग उभे केले. या काळात अनेक गीतकार व संगीतकारांनी अजरामर गीते लिहिली व सुंदर चाली दिल्या. आज गुणगुणता येतील अशी गाणीच निर्माण होत नसल्याबद्दल राज्यपालांनी खंत व्यक्त केली.

    भारतात लहान मुलांच्या चित्रपटांचा जागतिक दर्जाचा चित्रपट महोत्सव व्हावा तसेच युवकांच्या चित्रपटाचा देखील जागतिक महोत्सव व्हावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

    चित्रपट हे युवकांना प्रभावित करणारे माध्यम आहे. चित्रपट निर्मात्यांनी रचनात्मक आणि सकारात्मक चित्रपट तयार करून सामाजिक सलोखा व शांती निर्माण होईल असे चित्रपट तयार करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    कार्यक्रमाला चित्रपट सोहळ्याचे ज्युरी सदस्य पंडित सुवाशित राज व संस्थापक अध्यक्ष देवाशिष सरगम उपस्थित होते. यावेळी अनुप जलोटा यांनी भजन सादर केले.