बंद

    26.10.2022 : राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते ‘गढवाल पोस्ट’ रौप्य महोत्सव पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: October 26, 2022

    राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते ‘गढवाल पोस्ट’ रौप्य महोत्सव पुरस्कार प्रदान

    राजभवन येथे सिने जगतातील कलाकारांची मांदियाळी

    चित्रपट, साहित्य, कला, संस्कृती, प्रशासन क्षेत्रातील मान्यवर सन्मानित

    रमेश सिप्पी, मनिषा कोईराला, कबीर बेदी, विशाल भारद्वाज, हिमानी शिवपुरी, अनिल शर्मा सन्मानित

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ चित्रपट निर्माते रमेश सिप्पी, विशाल भारद्वाज, अभिनेते कबीर बेदी, मनिषा कोईराला, हिमानी शिवपुरी, रेखा भारद्वाज, विजय कुमार धवन, अनिल शर्मा, प्रशासकीय अधिकारी संजीव चोप्रा आदींना ‘गढवाल पोस्ट’ रजत महोत्सव जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी ‘गढवाल पोस्ट’ वार्षिक पुरस्कार तसेच ‘गढवाल पोस्ट’ रजत जयंती पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले.

    ‘गढवाल पोस्ट’ या देहरादून येथून प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी दैनिकाने आपल्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. पुरस्कार सोहळ्याला उत्तराखंडचे शिक्षण व आरोग्यमंत्री डॉ धनसिंह रावत, गढवाल पोस्ट दैनिकाचे मुख्य संपादक व अभिनेते सतीश शर्मा, उपेंद्र शर्मा, पटकथा लेखक भरत कुकरेती, किरण जुनेजा, प्रीती वालिया आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते दिग्दर्शक, लेखक व कलाकार तिग्मांशू धुलिया, अभिनेत्री दिव्या दत्ता, अंजली नौरियाल, अलोक उल्फत, सुधांशु पांडे, शिवांगी जोशी, कॉल्विन जेम्स हॅरिस, वरुण बडोला, हेमंत पांडे, राकेश दवे, वेल्ह्याम बॉईज स्कुलच्या प्राचार्य संगीता कैन, योगेश लाखानी, उद्योजक राकेश भट्ट, अभिनेत्री आयेशा नेगी, विक्रम माकंदर, दिनेश मनसेरा, ऍडव्होकेट दीपक कुमार, अभिनेते ईश्तेयाक खान, शेहझाद खान आदींना ‘गढवाल पोस्ट’ रजत जयंती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    सतीश शर्मा यांनी मसुरी हिल येथून सुरु केलेले ‘गढवाल पोस्ट’ रजत जयंती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मलबार हिल मुंबई येथे आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. देहरादून, मसुरी सारख्या लहान ठिकाणाहून इंग्रजी दैनिक २५ वर्षे सातत्याने चालविणे ही मोठी उपलब्धी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. चित्रपट सृष्टीत आपल्या पाय रोवलेल्या अभिनेत्यांनी नव्या कलाकारांना प्रोत्साहन दिल्यास ते अधिक समर्पक ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले. सतीश शर्मा यांनी प्रास्ताविक केले तर प्रिया मलिक यांनी सूत्रसंचालन केले.